प्रतिनिधी, मुंबई : कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन सुरु असून उद्योग-व्यवसाय ठप्प झाले आहेत. या काळात अनेकांचे आर्थिक उत्पन्नही थांबले आहे. अनेकांच्या नोकऱ्या जाण्याचीही भीती आहे. अशा परिस्थितीत आर्थिक चणचण असल्याने लोकांसमोर मोठं संकट उभं राहणार आहे. भाड्याच्या घरात राहणाऱ्या लोकांनाही घरभाडे भरणे कठीण होणार आहे. त्यामुळे राज्य सरकारनं या लोकांसाठी एक महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. त्यासाठी राज्याच्या गृहनिर्माण मंत्रालयातून एक पत्रकच निर्गमित करण्यात आले आहे.
भाड्याच्या घरात राहणाऱ्या लोकांची घरभाडे वसुली सध्याच्या बिकट परिस्थितीत किमान तीन महिने पुढे ढकलावी अशी सूचना गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार यांनी एका पत्रकाद्वारे घरमालकांना केली आहे. या तीन महिन्याच्या कालावधीत वेळेवर भाडे अदा केले नाही किंवा भाडे थकीत राहिले तर कोणत्याही भाडेकरूंना भाड्याच्या घरामधून बाहेर काढू नये, अशा सूचना सर्व घरमालकांना देण्यात येत आहेत, असं गृहनिर्माण विभागाच्या पत्रकात म्हटले आहे.
कोविड १९ मुळे बाजारपेठा, व्यावसायिक संस्था, कारखाने आणि एकूणच सर्व आर्थिक व्यवहार बंद आहेत. त्यामुळे सामान्य जनतेला कोविड १९ या साथीच्या रोगाबरोबरच कठीण आर्थिक परिस्थितीलाही सामोरं जावं लागत आहे. राज्यात भाड्याच्या घरांमध्ये राहणाऱ्या लोकांचे प्रमाण लक्षणीय असून आर्थिक अडचणीच्या परिस्थितीमुळे भाडेकरूंना ते राहत असलेल्या घराचे भाडे नियमितरित्या भरणे शक्य होत नाही व भाडे थकत आहे, ही वस्तुस्थिती आहे, असं या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
सरकारच्या या सूचनेमुळे घरभाडे थकले असेल तरी घरमालकाला तीन महिने तरी त्यासाठी तगादा लावता येणार नाही किंवा भाडेकरूला घराबाहेर काढता येणार नाही. सरकारच्या या सूचनेमुळे भाड्याच्या घरात राहत असलेल्या आणि आर्थिक विवंचनेत सापडलेल्या भाडेकरूंना दिलासा मिळाला आहे.