मुंबईतील लोकल ट्रेन लवकरच सुरु होणार? महाविकासआघाडीतील मंत्र्याकडून संकेत

आंतरजिल्हा एसटी सेवा आणि कोचिंग क्लासेसही सुरु होण्याची शक्यता 

Updated: Aug 15, 2020, 06:12 PM IST
मुंबईतील लोकल ट्रेन लवकरच सुरु होणार? महाविकासआघाडीतील मंत्र्याकडून संकेत  title=

मुंबई: कोरोनाच्या संकटामुळे ठप्प झालेली मुंबईची लाईफलाईन अर्थात लोकल ट्रेन सामान्यांसाठी लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबतचे संकेत दिले. त्यांनी म्हटले की, राज्यातील अर्थचक्र गतीमान करायचे असेल तर मुंबई पूर्वपदावर येणे गरजेचे आहे. त्यासाठी मुंबईतील लोकल ट्रेन सुरु झालीच पाहिजे. यासाठी राज्य सरकार अनुकूल असून लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली. याशिवाय, आंतरजिल्हा एसटी सेवा आणि कोचिंग क्लासेसही सुरु होण्याची शक्यता वडेट्टीवार यांनी वर्तविली.

आरोप प्रत्यारोपाच्या राजकारणात रस नाही, कोरोना रोखण्यावर आमचा भर- फडणवीस

 

मात्र, लोकल सेवा सुरु करताना काही नियम आखून देण्याची गरज आहे. यादृष्टीने राज्य सरकार विचार करत असल्याचेही वडेट्टीवार यांनी सांगितले. सध्या केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल ट्रेनने प्रवास करण्याची मुभा आहे. इतर नागरिकांना अद्याप ही परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे मुंबईलगतच्या परिसरातील चाकरमन्यांना नोकरी आणि उद्योगधंद्यासाठी शहरात येणे शक्य नाही. बेस्टची सेवा काहीप्रमाणात सुरु असली तरी प्रवाशांच्या प्रचंड संख्येमुळे यंत्रणेवर ताण येत आहे. या सगळ्यात नागरिकांचीही मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे आता सरकार यासंदर्भात काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सध्या मुंबईतील कोरोनाची साथ बऱ्यापैकी आटोक्यात आली आहे. मात्र, गर्दी वाढल्यास पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेकडून सावधपणे पावले टाकली जात आहेत.