Sanjay Raut : सत्ता राहणार की जाणार, पाहा संजय राऊत काय म्हणाले?

Sanjay Raut Exclusive Interview On Maharashtra Political Crieses : राजकीय घडामोडींबाबत शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांनी झी 24 ताससोबत एक्सक्लुझिव्ह बातचीत केली.   

संजय पाटील | Updated: Jun 21, 2022, 08:13 PM IST
Sanjay Raut : सत्ता राहणार की जाणार, पाहा संजय राऊत काय म्हणाले? title=

मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे राज्यातील राजकारणात नवं वळण आलं. या बंडामुळे राज्यात असलेलं 3 पक्षांचं सरकार पडून पुन्हा भाजपचा मुख्यमंत्री विराजमान होणार का, अशा उलटसुलट चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या. या सर्व राजकीय घडामोडींबाबत शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी झी 24 ताससोबत एक्सक्लुझिव्ह बातचीत केली. यामध्ये त्यांनी विविध मुद्द्यांवर आपली प्रतिक्रिया दिली. (maharashtra political crises sanjay raut exclusive on zee 24 taas over to eknath shinde controversy floor test maharashtra assembly magic figure)

एकनाथ शिंदेसोबत किती आमदार? 

"सकाळपासून शिवेसेनेचे काही आमदार स्वत: एकनाथ शिंदे नॉट रिचेबल आता रिचेबल झाले आहेत. त्यांच्याशी संवाद साधला गेला आहे. तिथल्या आमदारांनी आमच्याशी संवाद साधला आहे. ते सर्व आमदार गुजरातला आहेत. आमदार गुजरातमध्ये गुजरात पोलिसांच्या म्हणजेच भाजप कार्यकर्त्यांच्या कडेकोट बंदोबस्तात आहेत", अशा शब्दात राऊतांनी जोरदार टीका केली.

एकनाथ शिंदे आमचे जुने सहकारी

"ज्या हॉटेलमध्ये आमदार थांबलेत, त्या हॉटेलमध्ये भाजपचे महाराष्ट्रातील आकडेतज्ज्ञ आमदार तिथे जाऊन आलेत. परिस्थितीचं गांभीर्य आम्हाला कळतंय. मात्र शिवसेनेला अशा परिस्थितीला कसं सामोरं जायचं याचा सर्वाधिक अनुभव आहे. एकनाथ शिंदे आमचे जुने सहकारी आहेत, मित्र आहेत. पक्षामध्ये अनेक वर्ष आम्ही खांद्याला खांदा लावून काम केलंय. पर्वा माझ्यासोबत अयोध्येत होते. आम्ही एकत्र सर्व यंत्रणा राबवतो. त्यांच्या मनात काही शंका, गैरसमज असतील तर त्या दूर होऊ शकतात, त्या झाल्या पाहिजेत", असं राऊत यांनी नमूद केलं. 

"इतका मोठा पक्ष आहे, मतभेद असणं चुकीचं नाही. पण ज्या पद्धतीचं पाऊल ते उचलतायेत ते त्यांच्यासाठी सोयीचं आणि सुरक्षित नाही. शिंदे ज्यांच्यासोबत जाऊ इच्छितात किंवा ज्यांच्या भरोसशावर पुढे जाऊ इच्छितात, ही शिवसेनेच्या विचारात बसणारी गोष्ट नाही", असं राऊत म्हणाले.

एकनाथ शिंदेची मागणी काय?

"त्यांच्या ज्या मागण्या असतील त्या असतील.  मुख्यमंत्र्यांसोबत त्यांची चर्चा झाली असेल, असं मला वाटतं. मागणी काय असू शकते? आम्ही गेली अनेक वर्ष शिवसेनेच्या छत्रछायेखाली आहोत. आमच्यासारख्या सर्वसामांन्याना शिवसेनेनं मोठं केलं. राष्ट्रीय स्तरावर ओळख दिली. माझ्यासारख्या माणसाला 4 वेळा खासदार करुन दिल्लीत पाठवलं. नेतृत्वाची संधी दिली. एकनाथ शिंदेना गेल्या अनेक वर्षांपासून मी ओळखतो. शाखाप्रमुख असलेले शिंदे आज कॅबिनेट मंत्री म्हणून सर्वोच्च पदावर आहेत. त्यांच्याकडे नगरविकास खातं आहे.  समृद्धी महामार्गाची जबाबादारी, त्याआधी आरोग्य विभागाची जबाबदारी, तसेच  विरोधी पक्षेनेतेही होते. माणसाची कुवत आणि कतृत्व पाहून पक्ष शक्य ते देत असते", असंही राऊतांनी स्पष्ट केलं.

शिवसेनेला बंदोबस्त करता आला नाही?

"आम्ही अनेकदा समजूत काढण्याचा प्रयत्न करत असतो, शेवटी आपले सहकारी आहेत. कुणी चुकीच्या मार्गाने जात असेल तर आपण त्याचा हात पकडू शकतो. पण कुणी छुप्या मार्गाने जात असेल, तर ते लक्षात येत नाही. शिंदेसोबत असलेले आमदार हे कडवट आणि निष्ठावंत शिवसैनिक आहेत. मला खात्री आहे की त्यांच्यासोबत आमचा संवाद झाला की ते परत येतील. त्यापैकी काही आमदारांनी आम्ही अडकलो आहोत, आम्हाला फसवून आणलं आहे, असा निरोप पाठवला आहे", असंही राऊत म्हणाले.

पुत्रप्रेमामुळे वरिष्ठांचं महत्त्व कमी? 

"मी अनेक वर्षांपासून शिवसेनेचा नेता म्हणून काम करतोय. बाळासाहेबांनीच मला नेता बनवला. त्यानंतर आता एकनाथ शिंदे ही सर्व फळी आली. अनेक निर्णय असतात. पक्षाची बांधणी असते. हा पक्ष आदेशावर चालतो. आम्ही नेते असलो पदावर असलो तरी चर्चा होते. शेवटी सर्वस्वी अधिकार हे पक्षप्रमुखांना असतात. ते निर्णय पक्षप्रमुख घेतात. मात्र ते निर्णय हे सर्वसहमतीने घेतात", असंही राऊतांनी सांगितलं.

ठाकरेंची सत्ता राहणार की जाणार? 

"हे सरकार चालवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी तिन्ही पक्ष ठाम आहेत. बहुमत सिद्ध करण्याची वेळ आली तर आम्ही सभागृहात ते करु. इतका आत्मविश्वास आमच्यात आहे. सूरतमध्ये असलेले आमदार मुंबईत येऊ द्यात. त्यांनी आमच्याशी नजर भिडवू द्यात, मग त्याचं आमचं नात काय ते समोर येईल", असं राऊतांनी ठामपणे सांगितलं.