Eknath Shinde Update : एकनाथ शिंदे यांची शिवसेनेशी बंडखोरी? नाराजीची ही आहेत पाच कारणं

एकनाथ शिंदे यांनी केलेलं बंड हे शिवसेनेतलं 56 वर्षांमधलं सर्वात मोठं बंड

Updated: Jun 21, 2022, 05:43 PM IST
Eknath Shinde Update : एकनाथ शिंदे यांची शिवसेनेशी बंडखोरी? नाराजीची ही आहेत पाच कारणं title=

Maharahstra Politics : राज्याचे नगरविकास मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) त्यांच्या काही समर्थक आमदारांसह सूरतमध्य आहेत. त्यामुळे राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेलं बंड हे शिवसेनेतलं 56 वर्षांमधलं सर्वात मोठं बंड असल्याची चर्चा आहे.

मंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबई सोडून गुजरातमधल्या सूरतमध्ये मुक्काम ठोकला असून त्यांच्यासोबत शिवसेनेचे जवळपास 35 आमदार असल्याचे बोलले जात आहे. पण एकनाथ शिंदेंनी एवढं मोठं पाऊल का उचललं यालाही काही कारणे आहेत. 

कोण आहेत एकनाथ शिंदे?
दिवंगत आनंद दिघे यांच्यानंतर, शिवसेनेचा निष्ठावंत, ठाण्यातील शिवसेनेची भिस्त सांभाळणारा शिवसैनिक, ठाण्यात शिवसेनेचा बालेकिल्ला टिकवून ठेवणारा सच्चा कार्यकर्ता, उद्धव ठाकरेंच्या गटातला आणि जुना शिवसैनिक अशी एकनाथ शिंदे यांची ओळख आहे. सध्या आनंद दिघेंवरील धर्मवीर सिनेमानंतर आता एकनाथ शिंदेंची कॉलर आणखी टाईट झाली आहे. कारण आनंद दिघेंसोबतच एकनाथ शिंदेंच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात यात दाखवण्यात आली आहे. एकनाथ शिंदे आनंद दिघेंना देव आणि गुरु मानतात.

एकनाथ शिंदे नाराज असण्याची कारणं 

1 : मुख्यमंत्र्यांशी विसंवाद?
उद्धव ठाकरेंच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे सध्या शिवसेनेची धुरा ही युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंकडे देण्यात आली आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरेंचा पक्ष संघटना आणि शिवसेना बांधणीतला सहभाग कमी झाला आहे. त्यात त्यांचा शिवसेनेतील महत्वाच्या अन् जुन्या नेत्यांशीही असलेला संवादही कमी झाला. महाविकास आघाडीतील काही इतर नेते उद्धव ठाकरेंच्या जवळचे झाले आहेत. त्यातून आपल्याला डावललं जात असल्याची भावना एकनाथ शिंदेंच्या मनात बळावली गेली आहे.

2. आदित्य ठाकरेंकडे पक्षसंघटनेची, निवडणुकीची धुरा?
राज्यसभा निवडणूकीतील पराभवानंतर विधानपरिषद निवडणुकी वेळीही एकनाथ शिंदेंना विश्वासात घेण्यात आलं नसल्याचं बोललं जातं. त्यामुळेही एकनाथ शिंदे नाराज होते. शिवाय पक्षाच्या किंवा महाविकास आघाडीचं सरकारमधीला महत्वाच्या निर्णयांमध्ये आदित्य ठाकरेंना महत्व मिळतं. पण एकनाथ शिंदेंना डावलल्याची भावना आहे. शिवाय पक्षसंघटनेतही आदित्य ठाकरे वरुण सरदेसाईं सारख्या नव्या तरुण चेहऱ्यांना घेऊन पक्ष संघटन केले जात आहे. पण बाळासाहेबांशी एकनिष्ठ आणि उद्धव ठाकरेंच्या जवळच्या नेत्यांना मात्र बाजूला सारलं जात असल्याची भावना शिवसेनेतील नाराज गटात आहे

3. नगरविकास खात्यात हस्तक्षेप
महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत असलेल्या एकनाथ शिंदेंकडे नगरविकास खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली. पण त्यातही त्यांच्या कामात इतर दोन मंत्र्यांचा हस्तक्षेप होत असतो. असे असल्याने त्यांना मनमोकळेपणाने काम करता येत नसल्याचंही एक कारण आहे. शिवाय, नगरविकासमंत्री असूनही प्रत्येक निर्णयासाठी सही करण्यासाठी किंवा मंजुरीआधी मुख्यमंत्री कार्यालयाची मंजुरी घ्यावी लागते. यासाठी सचिव आणि अधिकारी वर्गाकडून एकनाथ शिंदेंना वारंवार सांगितलं जातं

4. अजित पवारांसोबत स्पर्धा
राज्यसभा निवडणूकीच्या वेळी अजित पवारांच्या एका गटाने देवेंद्र फडणवीसांना मदत केल्याचे बोललं जात होतं. त्यामुळे आपल्याला कायम अजित पवारांशी स्पर्धा करावी लागते, हे देखील एकनाथ शिंदेंच्या बंडामागचं एक कारण असल्यानंही एकनाथ शिंदेंनी मोठं पाऊल उचललं असावं अशी चर्चा आहे

5. संजय राऊतांची वक्तव्ये न पटणारी
संजय राऊत दररोज सकाळी पत्रकार परिषदांमध्ये राऊत शरद पवार यांचीच बाजू मांडत असतात. पण त्यामुळे याचा फटका शिवसेनेला बसत असल्याचं एकनाथ शिंदेंचं म्हणणं आहे. त्यामुळे संजय राऊतांच्या रोज होणाऱ्या रोजच्या पत्रकार परिषदा आणि त्यांच्या वक्तव्यांवरही एकनाथ शिंदे नाराज असल्याचं बोललं जात आहे.