'महायुती सरकार जनतेत जाऊन काम करणारं' आदित्य ठाकरेंच्या टीकेला मंगलप्रभात लोढा यांचं उत्तर

मुंबईकरांच्या समस्या सोडवण्यासाठी मुंबई महापालिकेत नव्याने पालकमंत्री दालन सुरु करण्यात आलं आहे. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या दालनाचं उद्घाटन केलं. तसंच यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांच्या आरोपांना उत्तरही दिलं.

Updated: Jul 21, 2023, 09:29 PM IST
'महायुती सरकार जनतेत जाऊन काम करणारं' आदित्य ठाकरेंच्या टीकेला मंगलप्रभात लोढा यांचं उत्तर title=

मुंबई :  महायुती सरकार जनतेमध्ये जाऊन काम करणारे सरकार असून, मुंबईतील पालकमंत्री कार्यालय हे जनतेसाठी कार्यरत राहणार आहे, असं वक्तव्य महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री व मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी केलं आहे. मुंबई महापालिकेत (Mumabi Municipal Corporation) नव्याने सुरू करण्यात आलेल्या पालकमंत्री दालनात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. घरी बसून किंवा सोशल मीडियावर सरकार चालवत नाही तर आम्ही महापालिकेच्या कार्यालयात बसून, नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन, त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. असंही मंत्री लोढा यांनी यावेळी स्पष्ट केलं.

मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री (Guardian Minister) या नात्याने मंगलप्रभात लोढा यांनी शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रशासनाच्यावतीने काम केलं. मुंबई उपनगरातील सर्व 15 वार्डमध्ये मंगलप्रभात लोढा यांनी पाहणी केली. यावेळी 15 हजारपेक्षा अधिक नागरिकांच्या समस्या प्राप्त झाल्या, त्यातील 3 हजारपेक्षा अधिक समस्यांचे जागीच समाधान देखील केल्याची माहिती त्यांनी दिली.  नागरिकांच्या अनेक समस्या मुख्य कार्यालयाशी निगडीत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. त्या दृष्टीने मुंबई उपनगरचा पालकमंत्री या नात्याने, विविध बैठकीसाठी अधिकाऱ्यांना मंत्रालयात बोलवावे लागते. हे सर्व सुकर व्हावे, या हेतूने मुंबई महापालिका कार्यालयात पालकमंत्र्यांचे दालन सुरू करण्यात आल्याचं मंत्री लोढा यांनी यावेळी सांगितलं.

मुंबई महापालिकेतील हे कार्यालय यापुढील काळात देखील मुंबई उपनगर जिल्ह्याचे जे पालकमंत्री होतील, त्यांचे कार्यालय म्हणून कार्यरत राहणार आहे. ठाकरे सरकार असताना मुंबईकरांना अनेक समस्यांना सामना करावा लागल्याचं त्यांनी म्हटलं. त्यामुळे आता नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या कार्यालयाला आदित्य ठाकरेंचा विरोध का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून, मी या कार्यालयात बसलो आहे. मुंबई उपनगरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यास आमचे प्राधान्य असेल असं  सांगत मंगप्रभात लोढा यांनी आदित्य ठाकरे यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. 

मुंबई मधील अतिवृष्टी परिस्थितीची पाहणी
मुंबई महानगपरलिकेच्या मुख्यालयात जाऊन मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थीची सुद्धा पाहणी केली. मुंबई मध्ये होणाऱ्या पावसाचे प्रमाण लक्षात घेऊन नागरिकांना होणार त्रास कमी करण्यासाठीची दक्षता प्रशासनातर्फे घेण्यात येत आहे.