कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : लोकसभेत फटका बसल्यानंतर आता महायुतीने (Mahayuti) विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Vidhan Sabha Election) जोरदार तयारी सुरु केली आहे. याचाच एक म्हणजे महायुतीने आणलेली लाडकी बहिण योजना (Ladki Bahin Yojana). या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना महिन्याला 1500 रुपये दिले जाणार आहे. महिलांच्या खात्यात हे पैसे जमा व्हायलाही सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणुकीत लाडकी बहिण योजना महायुतीसाठी गेमचेंजर ठरणार असल्याचं बोललं जातंय. पण यावरुन विरोधकांनी महायुतीवर अनेक आरोपही केले आहेत.
खासदार सुप्रिया सुळेंचा अजितदादांना टोमणा
लाडकी बहीण योजनेवरून सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार यांचं एकमेकांवर टीकास्त्र सुरू आहे. मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहात आयोजित मविआच्या मेळाव्यात सुप्रिया सुळे यांनी लाडकी बहिण योजनेवरुन अजित पवारांना चांगलाच टोमणा मारला आहे. लोकसभा निवडणुकीपर्यंत राज्यातील सत्तेतील भावांना बहिणींची आठवण झाली नाही,असा टोला सुप्रिया सुळेंनी अजित दादांना लगावलाय. 'लोकसभेपर्यंत बहिणीची आठवण झाली नाही. त्यांना बहिणीचे प्रेम कधी समजले नाही. प्रेमात व्यवसाय नसतो, 1500 रूपयांपर्यंत नाते विकाऊ नये. निरागस नात्याला किंमत लावण्याचे काम केले यांचे नाते मताशी आहे, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला.
लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंसमोर सुनेत्रा यांना निवडणुकीत उभं करायला नको होतं. माझी ती चूक झाली अशी कबुली अजित पवार यांनी नुकतीच दिली होती. यानंतर अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यातील नातं पुन्हा आधीसारखं होईल का ? अशी चर्चा सुरु झाली. जनसन्मान यात्रेच्या वेळी सुप्रिया सुळे जर त्याच शहरात असतील तर रक्षाबंधन साजरा करू असं वक्तव्यही अजित पवारांनी केलं होतं. मात्र, सुप्रिया सुळे यांनी लाडकी बहीण योजनेच्या निमित्तानं अजित पवारांना अप्रत्यक्षपणे उत्तर दिलंय
राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर
लाडकी बहिण योजनेवरुन सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांवर आरोप केल्यानंतर आता राष्ट्रवादीनेही सुप्रिया सुळे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. सुप्रिया सुळे ज्यावेळी पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवत होत्या त्यावेळी त्यांना मतदारसंघात कोणी ओळखत नव्हतं. अजित दादांनी त्यावेळी स्वतः कार्यकर्त्यांना बोलवून निवडून आणण्यासाठी सांगितल. रात्रंदिवस काम करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या होत्या. दादा स्वतः उमेदवार असल्यासारखे काम करत होते. पुढील तीनही टर्म दादांनी बॅकस्टेजला राहून काम केलं. प्रत्येकवेळी त्यांनी सुप्रिया सुळे यांना निवडून आणलं. हे केवळ बहिणीच्या प्रेमापोटी होते, सुप्रिया सुळे हे विसरल्या, अशी टीका राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी केली आहे.
शरद पवारांचं नाव नाही
दरम्यान, लाडकी बहीण योजनेचा शासनाच्यावतीने शनिवारी म्हणजे 17 ऑगस्टला बालेवाडी इथल्या स्टेडियममध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, पण शरद पवार हे राज्यसभेचे खासदार असतांना आणि शरद पवारांनी महिलांना 33 टक्के आरक्षण दिलं असतांना, लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात प्रोटोकॉल प्रमाणे शरद पवारांचं नाव पत्रिकेत छापण्यात यायला हवं होतं, पण या पत्रिकेत शरद पवारांचे नाव छापले नाहीये, ज्या शरद पवारांनी माता भगिनींना सन्मान आणि स्वाभिमान दिला ,त्या शरद पवारांचे नाव या निमंत्रण पत्रिकेत नसावं म्हणजे शरद पवारांना सरकार घाबरलंय, अशी टीका खासदार अमोल कोल्हे यांनी केली आहे.