प्रत्येक जिल्ह्यात प्लाझ्मा केंद्र, रुग्ण नातेवाईकांसाठी सीसीटीव्ही - राजेश टोपे

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात प्लाझ्मा थेरपी वाढवण्याचे ठरवले आहे.आता प्रत्येक जिल्ह्यात प्लाझ्मा केंद्र सुरु करत आहोत. 

Updated: Jul 2, 2020, 02:45 PM IST
प्रत्येक जिल्ह्यात प्लाझ्मा केंद्र, रुग्ण नातेवाईकांसाठी सीसीटीव्ही - राजेश टोपे

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात प्लाझ्मा थेरपी वाढवण्याचे ठरवले आहे. आता प्रत्येक जिल्ह्यात प्लाझ्मा केंद्र सुरु करत आहोत. कोरोनाला रोखण्यासाठी ही थेरपी उपयुक्त ठरत आहे.  १० पैकी नऊ रुग्णांना प्लाझ्मा थेरपीचा फायदा होत आहे.  त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात प्लाझ्मा केंद्रही सुरु करत आहोत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

काही भागात अनावश्यक गर्दी वाढत आहे. त्यामुळे विनाकारण बाहेर फिरु नये यासाठी दोन किलोमीटरचा निर्णय घ्यावा लागत आहे. जिथे लोक बेशिस्तीने वागतायत, तिथे स्थानिक प्रशासन जनता कर्फ्यू लावत असेल तर कोरोनाचा प्रसार वाढू नये यासाठी तसे अधिकार त्यांना दिले आहेत. अनेकांना याची नीट कल्पना नाही त्यामुळे ते बाहेर पडतात आणि त्यांचीवाहने जप्त केली जातात. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आणि  प्रसार होऊ नये म्हणून हे पाऊल उचललेले आहे. तरीही लोकांशी जास्त कठोर वागू नये, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आयुक्तांना दिल्या आहेत, असे यावेळी राजेश टोपे म्हणाले.

दरम्यान, आयसीयूमध्ये दाखल असलेल्या रुग्णांना नातेवाईक सीसीटीव्हीमुळे बघू शकतात, यासाठी सीसीटीव्ही बसविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती मंत्री  राजेश टोपे यांनी दिली. आपल्याकडे कम्युनिटी स्प्रेड आहे ,असं म्हणता येणार नाही. जे पॉझिटिव्ह आढळतात ते घरी अथवा संस्थात्मक विलिगीकरणातील लोक आहेत. त्यामुळे अद्याप महाराष्ट्रात कम्युनिटी स्प्रेड नाही, असे ते म्हणाले.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x