ठाकरे सरकारचे खातेवाटप आजही बारगळले

महाराष्ट्र विकासआघाडी सरकारचे खाते वाटप आजही बारगळलेच आहे. 

Updated: Jan 3, 2020, 10:41 PM IST
ठाकरे सरकारचे खातेवाटप आजही बारगळले title=

मुंबई : महाराष्ट्र विकासआघाडी सरकारचे खाते वाटप आजही बारगळलेच आहे. तिन्ही पक्षांच्या चर्चेचे गुऱ्हाळ काही केल्या संपेनाच असे दिसून येत आहे. जास्तीच्या खात्यावरुन काँग्रेसने ताणून धरल्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेस आणि शिवसेनेत खातेवाटपाबाबत चर्चा सुरुच असल्याचे सूत्रांचे सांगणे आहे. काँग्रेस जास्तीत जास्त खाती आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी दबाव आणत आहे. त्यामुळे सगळं ठरले असताना खातेवाटप जाहीर होण्यास उशिर होताना दिसत आहे. कधी मुहूर्त सापडणार, याची चर्चा सुरु झाली आहे.

महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार सत्तेवर येऊन आता एक महिना पूर्ण झाला आहे. एक महिन्यानंतर या सरकारला मंत्रीमंडळ विस्ताराचा मुहूर्त मिळालाय. मात्र विस्तारापूर्वी खातेवाटपावरून पुन्हा नाराजी नाट्य सुरू झालंय. काँग्रेसला ग्रामीण भागाशी संबंधित महत्त्वाच्या खात्यांपैेकी एक खातं हवं आहे.

महाविकास आघाडीचा खातेवाटप  तिढा सुटला तरी... 

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तीन पक्षांचं सरकार बनले, पण या सरकारचा मार्ग वाटतो तितका सुकर नाही. वर्षानुवर्ष सत्ता उपभोगलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर शिवसेनेने गाठ बांधली आहे. मात्र या संसारात पदोपदी अडचणी येत आहेत. २८ नोव्हेंबर रोजी उद्धव ठाकरे यांच्यासह सहा मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. मात्र या सरकारचे खातेवाटप व्हायला अनेक दिवसांचा कालावधी जावा लागला. त्यानंतर चर्चा सुरू झाली ती मंत्रिमंडळ विस्ताराची. विस्ताराच्या तारखांवर तारखा गेल्यानंतर आता ३० डिसेंबर ही तारीख निश्चित झाली होती. मात्र विस्ताराआधी पुन्हा खात्याच्या वाटपांवरून महाराष्ट्र विकास आघाडीत नाराजी नाट्य सुरू झाले आहे. दरम्यान, मंत्रिमंडळाचा विस्तार झाला पण खातेवाटपाचे घोडे अजून अडलेले दिसून येत आहे.

ग्रामीण भागाशी निगडीत एकही महत्त्वाचे खाते काँग्रेसला मिळालेले नाही, अशी काँग्रेसची धारणा आहे. ग्रामीण भागाशी संबंधित कृषी, ग्रामविकास, सहकार, जलसंपदा ही चार महत्त्वाची खाती आहेत. यातील ग्रामविकास आणि जलसंपदा ही खाती राष्ट्रवादीकडे तर कृषी आणि सहकार ही खाती शिवसेनेकडे आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी खाते वाटपाच्या चर्चेत याबाबत भूमिका न मांडल्याने काँग्रेसमध्ये काही नेते नाराजी व्यक्त करत आहेत. त्यामुळे आता जादा खाते पदरात पाडण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.  

खाते वाटपावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी कुठलाही वाद झाला नाही अशी प्रतिक्रिया मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. तीन पक्ष आहेत तेव्हा चर्चा तर होणारच. तो विषय गंभीर नाही. तो विषय संपल्याचे देखील चव्हाण म्हणाले. मी कोणत्याही खात्यासाठी आग्रही नाही. माझा पक्ष याबाबत जो निर्नय घेईल तो मला मान्य असेल, असे अशोक चव्हाण म्हणालेत. मी मूख्यमंत्री म्हणून संपूर्ण राज्याचा कारभार पाहिलाय, ते म्हणाले. कृषी किंवा महसूल खात्यासाठी चव्हाण आग्रही असल्याची चर्चा आहे. पण हे सगळ फक्त मीडियात सुरु आहे. याबाबत मी कुठेही वक्तव्य केले नसल्याचे अशोक चव्हाण म्हणालेत. दरम्यान, महाराष्ट्र विकास आघाडीच्या कालच्या बैठकीत अजित पवार आणि अशोक चव्हाण यांची चांगलीच खडाजंगी उडाली होती, असे वृत्त होते.