मुंबई : मॉल, सुपर मार्केट आणि किराणा स्टोअर्समध्येही वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. अर्थात, वाईन विक्रीसाठी किराणा स्टोअर किंवा सुपर मार्केटचा आकार एक हजार चौरस फुटांपेक्षा जास्त असण्याची अट घालण्यात आली आहे.
निर्णयाला भाजपाचा जोरदार विरोध
राज्य मंत्रिमंडळाच्या या निर्णयावर भाजपने मात्र जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणविस यांनी ठाकरे सरकारवर गंभीर आरोप करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
वाईन तयार करणाऱ्या एका फार मोठ्या उद्योजकासोबत नेमकी कोणाची बैठक झाली आणि ती नेमकी कुठे झाली, विदेशात झाली का? अशा प्रकारचा प्रश्नही आम्हाला विचारायचा आहे.
हा काही साधा घेतलेला निर्णय नाहीए, याच्यामागे फार मोठं अर्थकारण आहे, आणि महाराष्ट्राला मद्यराष्ट्र बनवण्याचं, हे जे काही स्वप्न या सरकारचं दिसंतय, त्याचा आम्ही निषेध करतो, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
गोंडसपणे शेतकऱ्यांचं नाव पुढे
काही लोकं गोंडसपणे शेतकऱ्यांचं नाव पुढे करत आहेत, पण शेतकऱ्यांसाठी हा निर्णय घेतलेला नाही, तर काही लोकांनी नव्याने दारुच्या कंपन्या आणि एजन्सी घेतल्या आहेत, त्यांचं भलं करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.