प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मानखुर्द: मुंबईतल्या मानखुर्दमधलं महात्मा फुले नगर 2 विक्रीला काढण्यात आलंय. स्थानिकांनीच हा निर्णय घेतलाय. पण खरेदीलाच कुणी येत नाही... का हा परिसर विकायला काढलाय आणि का कुणीच हा परिसर खरेदी करत नाही हे जाणून घ्यायचं असेल तर घ्या जाणून.
महात्मा फुले नगर २ विकणे आहे... या परिसरातल्या रहिवाशांनीच फुले नगर विकायला काढलंय. १४०० घरांच्या वस्तीत शौचालयं किती, तर २ त्यातलं एक बंद आणि दुसरं अर्धवट अवस्थेत. आणखी एक शौचालय आहे ते भाडेतत्वावर. मग अशा परिस्थितीत पुरूषांना रेल्वे रुळांवर शौचाला जावं लागतं. पण मग स्वच्छता अभियानाचं नाव पुढे करून त्यांच्यावर होते कारवाई... पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन गटारीतून गेल्यानं जे पाणी मिळतं तेही अशुद्धच... त्यामुळं परिसरात सतत रोगराई. रस्त्याचा पत्ताच नाही, त्यामुळं रुग्णवाहिका, अग्निशमन यंत्रणा आत पोहचू शकत नाही. येवढंच काय परिसरातल्या अंत्ययात्रा रेल्वेरुळांवरून न्याव्या लागतात. मुलभूत सुविधांसाठीची स्थानिकांची आंदोलनं निष्फळ ठरली.
रेल्वेनं मानखुर्दच्या पुढे मार्ग टाकला त्यावेळी महात्मा फुले नगरचे दोन भाग झाले. त्यात फुले नगर दोनच्या वाट्याला आलं असुविधांचं पॅकेज. निवडणुका आल्या की राजकीय नेते येतात. नंतर आहेच, येरे माझ्या मागल्या...
नागरी सुविधा पालिका पुरवते पण त्यात रेल्वे आडकाठी आणते असा स्थानिक नगरसेवकांनी आरोप केलाय.
बाहेर शौचाला बसले म्हणून स्थानिकांवर कारवाई होते पण शौचालय बंद असल्याने पालिकेवर कारवाई का होत नाही... असा साधा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केलाय. पण त्यालाही कुणी उत्तर देत नाहीये. अशा परिस्थितीत फुले नगर विकण्याशिवाय दुसरा पर्यायच त्यांच्याकडे नाही...