कर्जमाफीबरोबरच खरीप कर्जाची खातीही रिकामीच

राज्य सरकारने शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या कर्जमाफीचा गोंधळ सुरू असतानाच यावर्षीच्या खरीप हंगामात अनेक शेतकऱ्यांना बँकांकडून कर्जच मिळालं नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 

Updated: Oct 30, 2017, 10:57 PM IST
कर्जमाफीबरोबरच खरीप कर्जाची खातीही रिकामीच title=

दीपक भातुसे, झी मीडिया मुंबई : राज्य सरकारने शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या कर्जमाफीचा गोंधळ सुरू असतानाच यावर्षीच्या खरीप हंगामात अनेक शेतकऱ्यांना बँकांकडून कर्जच मिळालं नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 

यावर्षी राज्य सरकारनं खरीप कर्जाचं ठेवलंलं उद्दिष्ट्य केवळ 38 टक्केच पूर्ण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. गेल्यावर्षी हे उद्दिष्ट 76 टक्के पूर्ण झालं होतं. शेतकऱ्यांच्या नावावर आधीच कर्ज थकीत असल्यामुळे त्यांना बँकांकडून नवं कर्ज उपलब्ध झालं नसल्याचं या आकडेवारीवरून स्पष्ट होतंय.

यावर्षी राज्य सरकारने ४० हजार ५४७ कोटी रुपयांच्या खरीप कर्ज वाटपाचं उद्दिष्ट्य ठेवलं होतं. मात्र खरीप हंगाम संपला तोपर्यंत केवळ १५ हजार ५१७ कोटी रुपये कर्जाचं वाटप झालं होतं. 

टक्केवारीत ही आकडेवारी बघितली तर खरीप हंगामात केवळ ३८ टक्के कर्जाचं उद्दिष्ट यंदा पूर्ण झालं आहे. तर गेल्यावर्षी हेच उद्दिष्ट 76 टक्के पू्र्ण झाल्याचं राज्य स्तरीय बँकिंग समितीच्या आकडेवारीवरून स्पष्ट होतंय. शेतकऱ्यांना बँकांकडून कर्ज न मिळाल्यानं त्यांनी सावकारांकडून कर्ज घेतलं असून या सरकारने शेतकऱ्यांची थट्टा चालवली असल्याचा आऱोप याप्रकरणी काँग्रेसनं केलाय.