कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : मुंबईच्या माहिम नेचर पार्कवरून शिवसेनेनं भाजपला अडचणीत आणलंय. धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी या नेचर पार्कची जागा देण्याच्या राज्य सरकारच्या अधिसूचनेला शिवसेनेनं जोरदार विरोध केलाय. हे नेचर पार्क वाचविण्यासाठी खुद्द आदित्य ठाकरे मैदानात उतरलेत. धारावीला लागून असलेलं हे माहिम नेचर पार्क. १ जुलै २०१६ मध्ये राज्य सरकारनं दोन कोटी वृक्ष लागवड मोहिमेची सुरूवात याच पार्कातून केली होती. त्या बोर्डावरची अक्षरं धुसर होण्याआधीच सरकारनं हे निसर्ग उद्यानच नकाशावरून गायब करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या सेक्टर पाचसाठी या निसर्ग उद्यानातील जागा घेण्यासंदर्भातली अधिसूचना राज्य सरकारनं जारी केलीय. त्यासाठी मुंबईकरांकडून सूचना हरकती मागवल्यात. सरकारच्या या निर्णयाविरोधात शिवसेनेनं दंड थोपटलेत. युवा शिवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी या नेचर पार्कला भेट देत पर्यावरणप्रेमींशी चर्चा केली. कुठल्याही परिस्थितीत नेचर पार्क उद्धवस्त होऊ देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.
1977 पूर्वी इथं डंपिंग ग्राऊड होते. सा-या दक्षिण मुंबईचा कचरा इथं टाकला जात असे. डंपिंग ग्राऊंड बंद केल्यानंतर प्रसिद्ध पक्षी अभ्यासक डॉ. सलिम अली यांच्या संकल्पनेतून हे माहिम नेचर पार्क उभे राहिलं. इथं ८५ प्रकारची फुलपाखरू आढळतात. शिवाय विविध पक्ष्यांचा राबताही इथं असतो. फळझाडे, फूलझाडे, औषधी वनस्पती,जंगली झाडे इथं आहेत. मुंबईच्या मध्यभागी असलं तरी जंगलात आल्याची जाणीव करून देणारे हे नेचर पार्क निसर्गप्रेमींचं खास आवडीचं आहे. त्यामुळं ते वाचविण्यासाठी पर्यावरणप्रेमीही मैदानात उतरलेत.
आरे आणि नॅशनल पार्कमध्ये मेट्रोच्या माध्यमातून वृक्षसंपदेवर कु-हाडीचे घाव घातले जात आहेत. आता मुंबईच्या कुशीतील नेचर पार्कचा बिल्डरांच्या फायद्यासाठी बळी दिला जात असेल तर हे नक्कीच पर्यावरणासाठी धोकादायक आहे.