मुंबई: मराठा आरक्षण आणि त्यासाठी राज्यभर पेटलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची आज मुंबईत बैठक होत आहे. काँग्रेस विधीमंडळ पक्षाची बैठक विधानभवनात होणार असून, राष्ट्रवादी काँग्रेस विधीमंडळ पक्षाची बैठक विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी होणार आहे. या स्वतंत्र बैठका पार पडल्यानंतर दोन्ही पक्षांची एकत्र बैठकही होणार आहे. मराठा आरक्षणासंदर्भात सरकारवर कशा प्रकारे दबाव टाकायचा. त्याचबरोबर राज्यभर सुरू असलेल्या मराठा आंदोलनासंदर्भात काय भूमिका घ्यायची याबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या आमदारांची आज (सोमवार, ३० जुलै) बैठक बोलावली आहे.. दुपारी १२ वाजता मातोश्रीवर ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीत मराठा आरक्षणासंदर्भात आमदारांची मतं पक्षप्रमुख जाणून घेणार आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात सरकारवर कशा प्रकारे दबाव टाकायचा त्याचबरोबर राज्यभर सुरू असलेल्या मराठा आंदोलनासंदर्भात काय भूमिका घ्यायची याबाबतही या बैठकीत चर्चा होणार आहे.
राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटलेला असतानाच आता धनगर समाजही आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. पुढील धोरण ठरवण्यासाठी ५ ऑगस्टला पुण्यात कृती समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये धनगर समाजातील सर्वपक्षीय नेते उपस्थित असतील. धनगर समाजाचा समावेश आदिवासींमध्ये करण्यात यावा ही प्रमुख मागणी असेल. बारामतीमधील शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत ५ ऑगस्टला बैठक बोलवण्याचा निर्णय घेण्यात आला.