मुंबई : मारूती सुझुकी इंडियाने एक विशेष सर्व्हिस कॅम्पेन सुरू केलं आहे. ऑनलाईन वेबसाईट मनी कंट्रोल डॉट कॉमने ही बातमी दिली आहे. या बातमीनुसार कंपनीच्या या अभियानात सियाज डिझेल गाडीसह अल्फा आणि जेटा वेरिएंटमधील स्पीडोमीटर असेम्बलीत बदल केले जात आहेत. कंपनीने म्हटलं आहे की, याला रिकॉल म्हणता येणार नाही, कारण गाडीत तांत्रिक कमतरता नाही, तर सुरक्षेसंबंधी अडचण दूर केली जात आहे.
ऑटोमोबाईल कंपन्या जगभरात असं सर्व्हिस कॅम्पेन चालवतात. या अभियानानुसार गाडीत येणाऱ्या लहान मोठ्या समस्या दूर केल्या जातात. या अडचणी सोडवल्यानंतर ग्राहकांसाठी गाडी आणखी आरामदायक होते.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, सियाझ डिझेल आणि जेटा तसेच अल्फा वेरिएंटच्या जवळजवळ 880 गाड्यांमध्ये हे बदल केले जाणार आहेत. या गाड्यांचं उत्पादन १ ऑगस्ट २०१८ पासून २१ सप्टेंबर २०१८ दरम्यान झालं आहे.
या अभियानाबद्दल गाडी मालकांना मागील महिन्यात सांगण्यात आलं होतं. गाडीचं स्पिडोमीटर बदलण्याचं काम कंपनी मोफत करणार आहे.