खुशखबर ! माथेरानची राणी पुन्हा धावणार

पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेली माथेरानची राणी पुन्हा रुळांवर येण्याची शक्यता आहे. 

Updated: Dec 26, 2019, 11:23 AM IST
खुशखबर ! माथेरानची राणी पुन्हा धावणार title=

देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई  : पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेली माथेरानची राणी पुन्हा रुळांवर येण्याची शक्यता आहे. सध्या अमन लॉज ते माथेरान स्टेशन अशा चाचण्या सुरू आहेत. लवकरच राणी दिमाखात प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल. मुंबईच्या जवळ असलेल्या माथेरानची मिनी ट्रेन पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू...माथेरानला गेला आणि मिनी ट्रेनची सफर केली नाही तर पर्यटकांना माथेरानची सहल पूर्ण झाल्याशिवाय वाटत नाही. 

अतिवृष्टीमुळे पुन्हा रेल्वे रुळांचं नुकसान

माथेरानच्या डोंगरावरुन हळूहळू जाणाऱ्या या माथेरानच्या राणीला अपघातांचं ग्रहण लागलंय. गेल्या काही वर्षापासून माथेरान राणी वेळापत्रकाप्रमाणं रुळावर धावलीच नाही. 

गेल्या वर्षी रेल्वेरुळांची दुरुस्ती आणि इंजिनाच्या दुरुस्तीनंतर माथेरानची गाडी रुळावर आली. पण पावसाळ्यात झालेल्य़ा अतिवृष्टीमुळे पुन्हा रेल्वे रुळांचं नुकसान झालं. शिवाय शटलही रुळांवर घसरली. त्यामुळं दसऱ्याला सुरु होणारी माथेरानची राणी सुरु झालीच नाही. 

पर्य़टनावरही विपरीत परिणाम

माथेरानची राणी पुन्हा सुरू होणार की नाही याबाबत स्थानिक लोकांमध्येही चिंता होती. कारण मिनीट्रेन बंद असल्यानं त्याचा पर्य़टनावरही विपरीत परिणाम होत होता. त्यामुळं माथेरानची राणी पुन्हा सुरू करावी अशी मागणी होत होती. शेवचटी पर्य़टकांच्या मागणीचा रेल्वेनं सकारात्मक विचार केला. 

राणीच्या चाचण्या अंतिम टप्प्यात

आता नेरळ माथेरान रेल्वे मार्गाची दुरुस्ती वेगानं झालीय. अनम लॉज ते माथेरान स्टेशनपर्यंतच्या चाचण्यांना सुरुवात झालीय. चाचण्यांनंतर मिनी ट्रेनची शटल सर्व्हिस सुरु होईल. त्यानंतर नेरळ ते माथेरान अशी सेवाही सुरु होण्याची शक्यता वाढलीय. येत्या काळात माथेरानच्या घाटातून मिनी ट्रेन दिमाखात धावेल अशी अपेक्षा आहे.