MHADA Lottery 2024: 'हास्यजत्रे'तील 2 कालाकारांना लागली घराची लॉटरी; आता चाळीतून थेट टॉवरमध्ये

MHADA Lottery 2024 Maharashtrachi Hasya Jatra Winners: कालाकार कोट्यातून तीन प्रसिद्ध कलाकारांना यंदाच्या म्हाडा लॉटरीमध्ये घर लागलं असून एका खासदाराचाही नशीबवान विजेत्यांमध्ये समावेश आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 9, 2024, 08:11 AM IST
MHADA Lottery 2024: 'हास्यजत्रे'तील 2 कालाकारांना लागली घराची लॉटरी; आता चाळीतून थेट टॉवरमध्ये title=
एकूण तीन कलाकारांना लागलं घर (प्रातिनिधिक फोटो)

MHADA Lottery 2024 Maharashtrachi Hasya Jatra Winners: म्हाडाच्या मुंबई मंडळामधील 2 हजार 30 घरांसाठी मंगळवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सोडत काढण्यात आली. अनेक नशिबवान मुंबईकरांना या सोडतीमध्ये शहरात हक्काचं घर मिळालं आहे. या नशिबवानांमध्ये सर्वासामान्यांबरोबर काही खास चेहऱ्यांचाही समावेश आहे. प्रामुख्याने लोकप्रतिनिधी आणि काही कलाकारांना या सोडतीमध्ये घराची लॉटरी लागली आहे. माजी खासदार राजू शेट्टीसहीत एकूण 27 कलाकारांनी यंदाच्या सोडतीमध्ये अर्ज भरला होता. त्यापैकी राजू शेट्टींबरोबरच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'फेम कलाकारांना घर लागलं आहे. फिल्टर पाड्याच्या बच्चन आता म्हाडाची लॉटरी लागल्याने टॉवरमध्ये राहायला जाणार आहे. तर भांडूपमधील चाळीत राहणारा निखिल बनेही म्हाडाचं घर लागल्याने आता फ्लॅटमध्ये राहायला जाणार आहे. केवळ हे दोघेच नाही तर 'बिग बॉस 2'च्या मराठी पर्वाचा विजेता शिव ठाकरेलाही घर लागलं आहे.

'या' कलाकाराने केलेले दोनपेक्षा अधिक अर्ज तर एकाला एकाच अर्जात लागलं घर

राजू शेट्टींनी पवईमधील घरासाठी अर्ज केलेला. येथे लोकप्रितिनिधींसाठी तीन घरं राखीव असताना एकच अर्ज आल्याने राजू शेट्टींना घर लागलं. त्यांना घर लागणार हे निश्चित होतं. फक्त याची घोषणा लॉटरीच्या दिवशी झाली. पवईमधील घरासाठी गौरव मोरेने पवईमधील घरासाठी अर्ज केला होता. विशेष म्हणजे एकच अर्ज करुन गौरव खरोखरच लकी ठरला असून त्याला उच्च उत्पन्न गटातील घर लागलं आहे. याच ठिकाणी शिव ठाकरेलाही उच्च गटातील घर लागलं आहे. मात्र शिव ठाकरेने पवईबरोबरच गोरेगावमधील घरासाठीही अर्ज केला होता. 'हास्यजत्रे'त गौरवबरोबर काम करणाऱ्या निखिल बनेनं देखील दोनहून अधिक ठिकाणी अर्ज केला होता. तो विक्रोळीमधील कन्नमवार नगर येथील घराच्या सोडतीमध्ये विजेता ठरला आहे.

घर लागल्यापेक्षा याचा जास्त आनंद आहे की...

मुंबईमध्ये मी अनेकदा येत असतो. तसेच माझे कार्यकर्तेही नियमितपणे येत असतात. अशावेळी राहण्याची योग्य सोय नसल्याने अनेकदा अडचण निर्माण होत होती. याच कारणामुळे मी यावेळी म्हाडाच्या घरासाठी अर्ज केला होता. आता सोडतीत मी विजेता ठरलो आहे. याचा मला फार आनंद झाला आहे. मला घर लागलं त्यापेक्षा आता माझी आणि कोल्हापूरमधून मुंबईत कामानिमित्त येणाऱ्या माझ्या कार्यकर्त्यांची राहण्याची सोय होणार असल्याचा अधिक जास्त आनंद आहे, अशी प्रतिक्रिया माजी खासदार राजू शेट्टी यांनी नोंदवली आहे.

स्वप्न पूर्ण झालं

मी मागील काही दिवसांपासून मुंबईत राहायला आहे. मुंबईमध्ये हक्काचं घर हवं असं माझं स्वप्न होतं. परवडणारी घरं म्हणजे म्हाडा असं समिकरण आङे. म्हणूनच मी पवई आणि गोरेगावमधील घरासाठी अर्ज केलेला. आज मला पवईमधील घर लागलं आहे याचा फार आनंद आहे. माझं हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होत आहे, असं शिव ठाकरेंने सांगितलं.