Mumbai Mhada Lottery 2024: म्हाडाच्या मुंबई मंडळाने 2024साठी 2030 घरांसाठी लॉटरी काढली आहे. म्हाडाची लॉटरी जाहिर झाल्यापासून त्याच्या किंमतीवरुन नाराजी व्यक्त करण्यात आली होती. अखेर म्हाडाने घरांच्या किंमती 10 ते 25 टक्क्यांनी कमी करण्यात आल्या आहेत. मात्र, असं असतानाच १३ सप्टेंबर रोजी काढण्यात येणारी सोडत अखेर पुढे ढकलण्यात आली आहे.
म्हाडा प्राधिकरणाने मुंबई मंडळाच्या २०३० घरांच्या सोडतीतील अर्जविक्री-स्वीकृतीला १५ दिवसांची मुदतवाढ दिली आहे. आता ४ सप्टेंबरऐवजी इच्छुकांना १९ सप्टेंबरपर्यंत अनामत रक्कमेसह अर्ज सादर करता येणार आहे. मात्र त्याच वेळी १३ सप्टेंबरची सोडत लांबणीवर गेली असून लवकरच सोडतीची नवीन तारीख जाहीर करण्यात येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता सप्टेंबरअखेरीस म्हाडाची लॉटरी काढण्यात येणार आहे.
मुंबईतील विविध ठिकाणच्या २०३० घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध करत मंडळाने ९ ऑगस्टपासून अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेस सुरुवात केली. मात्र या प्रक्रियेसाठी केवळ २६ दिवसांचाच कालावधी देण्यात आला होता. या प्रक्रियेसाठी किमान ४५ दिवसांचा कालावधी दिला जातो. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोडत लवकर काढण्याचा आग्रह राज्य सरकारचा होता. पण आता आचारसंहिता लांबणीवर पडल्याने म्हाडाने अखेर १३ सप्टेंबरची सोडत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. तसेच अर्जविक्री-स्वीकृतीस मुदतवाढ दिली. अर्जविक्री-स्वीकृतीला १५ दिवसांची अर्थात १९ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी दिली.
म्हाडाच्या धरांची लॉटरी सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात काढली जाणार आहे. नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये लॉटरी काढण्याचा कार्यक्रम होण्याची शक्यता आहे.
म्हाडासाठी अर्ज करताना हे लक्षात घ्या.
- नोंदणी करताना इच्छुक अर्जदाराचा मोबाइल नंबर आधारसोबत लिंक करणे गरजेचे आहे.
- नोंदणी करतेवेळी अर्जदाराला डीजी लॉकर या अॅपमध्ये स्वतःसह पती-पत्नीचे आधार आणि पॅन कार्ड अपलोड करुन ते लिंक करणे गरजेचे आहे.
- अर्जदाराने 1 जानेवारी2018 रोजीनंतर जारी केलले आणि बार कोड असलेले डोमिसाइल अपलोड करणे आवश्यक आहे.
म्हाडा मुंबई मंडळ सोडतीतील ३७० सदनिकांच्या विक्री किंमतीत १० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आली आहे. म्हाडाला गृहसाठा म्हणून प्राप्त झालेल्या ३७० सदनिका संगणकीय सोडत प्रणालीतून विक्रीसाठी जाहीर करण्यात आल्या आहेत. यातील अत्यल्प उत्पन्न गटातील सदनिकांच्या किंमती २५ टक्क्यांनी कमी करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले तसेच अल्प उत्पन्न गटातील सदनिकांच्या किंमती २० टक्क्यांनी, मध्यम उत्पन्न गटातील सदनिकांच्या किंमती १५ टक्क्यांनी, उच्च उत्पन्न गटातील सदनिकांच्या किंमती १० टक्क्यांनी कमी करण्यात आल्या आहेत.