प्रथमेश तावडे,झी मीडिया, वसई : गेल्या सहा ते सात महिन्यांपासून लोकल सेवा सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद असल्याने रोजचा खर्चिक व खडतर प्रवास करून कामाचे ठिकाण गाठणाऱ्या प्रवाशांमध्ये सरकारविरोधात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. मुंबईची वाहिनी म्हणून ओळखली जाणारी लोकल सेवा बंद असल्याने अनेकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे लोकल सर्वसामान्यांसाठी खुली न केल्यास जनतेवर बेकारीची परिस्थिती ओढवेल असे मत बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी व्यक्त करत सरकारकडे लोकलसेवा खुली करण्याची मागणी केली आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रादुर्भाव वाढू नये यासाठी मुंबई उपनगरीय रेल्वे सेवा गेल्या पाच महिन्यांपासून खासगी कर्मचाऱ्यांसाठी बंद आहे. या दरम्यान या कर्मचाऱ्यांना जिल्ह्याबाहेर तसेच जिल्ह्यांतर्गत कामावर जाणे अनिवार्य असल्यामुळे त्यांना एसटी किंवा खासगी वाहनांनी प्रवास करावा लागतो. एसटी किंवा खासगी वाहनांनी प्रवास करताना विविध रस्त्यांची झालेली दुरावस्था यामुळे त्यांचा हा प्रवास खडतर होत आहे.
याच बरोबरीने एसटी मधून प्रवास करत असताना त्यासाठी लांबचलांब रांगा, अपुरी एसटी सेवा तसेच तासंतास झालेली वाहतूक कोंडी अशा अनेक विवीध कारणांमुळे खासगी कर्मचाऱ्यांचा जीव मेटाकुटीला आला आहे. याच कारणांमुळे नुकताच नालासोपारा रेल्वे स्थानक व विरार रेल्वे स्थानकात प्रवाशांचा उद्रेक पाहावयास मिळाला होता. मात्र अजूनही या प्रवासयातना संपलेल्या नसून पुन्हा एकदा या खासगी कर्मचाऱ्यांचा संताप उफाळून येण्याची दाट शक्यता आहे.
लोकल ने प्रवासाची मुभा नसल्याने शेतकरी , बागायतदार आणि दुग्ध व्यावसायिक खासगी मालवाहतूक वाहनांनी हि सेवा आर्थिक फटका सहन करत आजही अखंडित पणे देत आहेत. त्यांनाही लोकल सेवेचा लाभ न मिळाल्याने या वर्गाकडूनही तीव्र संताप व्यक्त होत असून त्यांचा आर्थिक कणा मोडला आहे.
वसई विरारच नव्हे तर ठाणे, कल्याण,डोंबिवली, नवीमुंबई येथील खासगी कर्मचाऱ्यांना नोकरीचा इतर पर्याय उपलब्ध नसल्याने तसेच शेतकरी, बागायतदार व दुग्ध व्यावसायिक यांनाही मालविक्रीकरिता इतर बाजारपेठ उपलब्ध नसल्याने खिशाला कात्री लावून ते प्रवासयाताना सहन करीत आहेत. त्यामुळे या वर्गाकडून लोक
त्यामुळे या वर्गाकडून लोकल सेवेचा लाभ मिळावा अशी मागणी जोर धरत आहे. या सर्वबाबींचा विचार करून त्यांना लोकल मध्ये प्रवासाला मुभा मिळावी यासाठी आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितिज ठाकूर आणि आमदार राजेश पाटील यांच्या वतीने रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे पत्र व्यवहार करण्यात आला आहे.