Siddhivinayak Ganapati Temple Trust Chairman: शिवसेना नेते आणि श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांना शिंदे गटाकडून मोठा धक्का देण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाअंतर्गत येणाऱ्या श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास, व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष पदावरुन आदेश बांदेकरांना बाजुला करत शिंदे गटाच्या आमदाराला अध्यक्षपद देण्यात आले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
माहीम विधानसभेचे आमदार सदा सरवणकर यांची महाराष्ट्र शासनाच्या श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास, व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासन राजपत्राद्वारे याची घोषणा करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाने श्री सिद्धिविनायक गणपती मॉदर विश्वस्त- व्यवस्था (प्रभादेवी) अधिनियम, 1980 (सन 1981 चा महाराष्ट्र अधिनियम क्र. 6) च्या कलम 5 चे पोट-कलम (3) तसेच, कलम 7द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर केला आहे.
23 जुलै 2020 रोजी आदेश चंद्रकांत बांदेकर यांची, श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास, प्रभादेवी, मुंबई येथील व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून तीन वर्षांच्या कालावधीसाठी पुनर्नियुक्ती केली होती. आदेश चंद्रकांत बांदेकर यांचा श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास, प्रभादेवी, मुंबई येथील व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पदाचा कार्यकाळ दिनांक 23 जुलै 2023 रोजी संपुष्टात आला आहे.
श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर विश्वस्तव्यवस्था (प्रभादेवी) अधिनियम, 1980 (सन 1981 चा महाराष्ट्र अधिनियमः क्र. 6) च्या कलम 5 चे पोट-कलम (3) तसेच कलम 7 द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन सदानंद शंकर सरवणकर यांची श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर विश्वस्तव्यवस्था, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून दिनांक 6 नोव्हेंबर 2023 पासून पुढील 3 वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती करीत असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे.