लालबागचा राजा यांना कधी सुबुद्धी देईल, १३५ जणांना गंडवलं...!

गणपती विसर्जन सोहळ्यादरम्यान होणारी मोबाईल चोरी काही नवीन राहिलेली नाही.

Updated: Sep 17, 2018, 10:33 PM IST
लालबागचा राजा यांना कधी सुबुद्धी देईल, १३५ जणांना गंडवलं...! title=

मुंबई : गणपती विसर्जन सोहळ्यादरम्यान होणारी मोबाईल चोरी काही नवीन राहिलेली नाही. दरवर्षी विसर्जन सोहळ्यात उसळणाऱ्या प्रचंड गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोर भक्तांना लक्ष करतात, शेकडोंच्या संख्येने मोबईलची चोरी होते. मात्र यंदा गणेशोत्सवादरम्यानच चोऱ्यांना उधाण आलं आहे. लालबागचा राजा या चोरांना कधी सुबुद्धी देईल असाच प्रश्न सर्वांना पडतोय.

गेल्या चार दिवसात मुंबईच्या लालबाग परिसरात (लालबागच्या राजाच्या) दर्शनासाठी आलेल्या तब्बल १३५ भाविकांचे मोबाईल गेल्याचं समोर आलं आहे. यातील काहींनी तक्रारी नोंदवल्या आहेत, तर अनेकांनी तक्रारी नकरणेच पसंत केले आहे. 

मुंबईच्या लालबाग परिसरात मुंबईचा राजा, तेजुकाया मॅन्शनचा गणपती, रंगारी बदक चाळीचा गणपती, अशी अनेक नावाजलेली मंडळं आहेत. या मंडळांच्या भव्य मूर्ती आणि सुरेख देखावे बघण्यासाठी भक्त संपूर्ण देशातून लालबागला येत असतात. 

बाप्पाच्या दर्शनासाठी येथे २४ तास गर्दी असते आणि त्याच गर्दीत घूसून, हे मोबाईल चोर आपला डाव साधतात. खास गणेशभक्तांना लक्ष करण्यासाठी परराज्यातून टोळ्या मुंबईत आल्याची देखील उदाहरणे आहेत.