मुंबई: भाजपचे आमदार राम कदम यांनी महिलांसंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानाप्रकरणी महिला आयोगाची बिनशर्त माफी मागितली आहे. दहीहंडीच्या कार्यक्रमात राम कदम यांनी तरुणांना उद्देशून म्हटले होते की, तुम्हाला एखादी मुलगी आवडली तर माझ्याकडे या. तुमच्या आई-वडिलांचाही याला होकार असेल तर, मी तुमच्यासाठी तिला पळवून आणेन. राम कदम यांच्या वक्तव्यानंतर समाजातून टीकेची मोठी झोड उठली होती.
या पार्श्वभूमीवर महिला आयोगाने ५ सप्टेंबर रोजी राम कदम यांना नोटीस पाठविली होती. ्यानुसार आमदार कदम यांनी आयोगाकडे लेखी खुलासा सादर केला असून आयोगाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील महिलांची बिनशर्त माफी मागितली आहे. तसेच भविष्यात महिलांचा सन्मान वाढविण्यासाठी कार्यरत राहण्याची हमीही दिली आहे. आमदार कदम यांच्या या खुलाशावर कायदेशीर सल्ला घेऊन योग्य ती कार्यवाही करु, अशी माहिती महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजया रहाटकर यांनी दिली.