Ratan Tata Death: सर्वसामान्यांनाही घेता येणार रतन टाटांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन

Ratan Tata Last Rites Darshan: ब्रीच कॅण्डी येथे रतन टाटा यांनी अखेरचा श्वास घेतला. सोमवारी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 10, 2024, 06:49 AM IST
Ratan Tata Death: सर्वसामान्यांनाही घेता येणार रतन टाटांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन title=
मुंबईत झालं रतन टाटा यांचं निधन

Ratan Tata Last Rites Darshan: जगप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं बुधवारी रात्री मुंबईतील ब्रिच कॅण्डी रुग्णालयामध्ये वयाच्या 86 व्या वर्षी निधन झालं. मागील बऱ्याच काळापासून ते प्रकृतीसंदर्भातील समस्यांना तोंड देत होते. सोमवारी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारांदरम्यान त्यांनी बुधवारी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्या निधनाचं वृत्त समोर येताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. तसेच प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील असं जाहीर केलं आहे. दरम्यान, सर्वसामान्यांनाही रतन टाटांच्या पार्थिवाचे अत्यंदर्शन घेता येणार आहे. 

आजचे सर्व कार्यक्रम रद्द

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळातील शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी, "राज्य सरकारचे मुंबईतील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत," असं सांगितलं. 

अंत्यदर्शनासाठी कुठे ठेवलं जाणार पार्थिव

मुंबई दक्षिण विभागाचे अतिरिक्त आयुक्त अभिनव देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, "रतन टाटा यांचे पार्थिव एनसीपीए येथे अत्यंदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे. सकाळी 10 ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत रतन टाटांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेता येणार आहे. यासंदर्भात पोलिसांनी सर्व तयारी केली आहे."

रात्री घरी नेण्यात आलं पार्थिव

रात्री तीन वाजण्याच्या सुमारस रतन टाटा यांचे पार्थिव त्यांच्या कुबाल्यातील घरी नेण्यात आलं. 

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'रतनजी टाटा हे भारताचा अभिमान'

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सोशल मीडियावरुन रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. "नैतिकता आणि उद्यमशीलता यांचा  पूर्व आणि आदर्श संगम रतनजी टाटा यांच्या ठायी होता. सुमारे 150 वर्षांची श्रेष्ठत्व आणि सचोटीची परंपरा असलेल्या टाटा ग्रुपची जबाबदारी यशस्वीरित्या पेलणारे रतनजी टाटा हे एक जिवंत आख्यायिका होते. त्यांनी वेळोवेळी दाखविलेला निर्णायक खंबीरपणा आणि मानसिक कणखरपणी टाटा ग्रूपला वेगळ्या औद्योगिक उंचीवर घेऊन गेला. त्यांना मी आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. रतनजी टाटा यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील. रतनजी टाटा हे भारताचा अभिमान होते, येत्या पिढीच्या उद्योजकांसाठी ते नेहमीच एक आदर्श राहतील," असं मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलं आहे. तसेच पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी, "रतनजी टाटा यांनी अतिशय कौशल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या अनेक कंपन्यांना टेकओव्हर करुन व्यवसाय वाढवला. माहिती तंत्रज्ञानाच्या नव्या क्षेत्रांतही त्यांनी दमदारपणे आघाडी घेतली. टाटा ग्रूपची विश्वासार्हता जपत त्यांनी टाटा ग्रूपचा विस्तार केला. आपल्या निर्णयक्षमतेने त्यांनी टाटा ग्रुपच्या कंपन्यांमध्ये सळाळते चैतन्य निर्माण केले. नैतिकता जपत उद्योगाबरोबरच देश आणि समाजाचा विकास करण्याची टाटांची विचारधारा आणि परंपरा त्यांनी समर्थपणे सांभाळली. रतनजी टाटा यांची औद्योगिक झेप आकाशाला गवसणी घालणारी होती," असंही म्हटलं आहे.

सामाजिक बांधिलकी कायमच स्मरणात राहील

"तरुणांमधील कर्तृत्वाला, प्रयोगशिलतेला प्रोत्साहन देण्यात ते कायम आघाडीवर होते. 1991 मध्ये रतनजी टाटा टाटा समूहाचे अध्यक्ष झाले. त्यांच्या कार्यकाळात टाटा समूहाचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला. त्यांनी टेल्को (नंतर टाटा मोटर्स) ची कार निर्मिती क्षेत्रात आणि टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस (TCS) ची माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीची कंपनी बनवली. तसेच, टाटा केमिकल्स, टाटा टी, टाटा स्टील यासारख्या अनेक कंपन्यांना त्यांनी यशस्वी केले. 2012 मध्ये ते टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त झाले. मात्र, त्यानंतरही ते विविध उद्योगांना मार्गदर्शन करत होते. 2008 च्या मुंबई हल्ल्यांनंतर रतनजी टाटा यांनी दाखवलेला खंबीरपणा सगळ्यांच्या कायमच स्मरणात राहील. त्यांचे निर्णय, धाडसी वृत्ती आणि सामाजिक बांधिलकी यांचे स्मरण कायम राहणार आहे," असं मुख्यमंत्री शिंदेंनी पोस्टच्या शेवटी म्हटलं आहे.