MP Help Car Owner: राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असल्याने अनेक आमदार हे सध्या मुंबईमध्ये आहेत. त्याचप्रमाणे अनेक खासदारही काही ना काही कारणानिमित्त मुंबईचे दौरे करत असतात. सोमवारी महाराष्ट्रातील खासदारांपैकी एका खासदार चक्क रस्त्यावर उतरुन गाडीला धक्का मारताना दिसला. विशेष म्हणजे हा खासदार ज्या गाडीला धक्का मारत होता ती त्याची स्वत:ची गाडी नव्हती तर एका अनोळखी व्यक्तीची चारचाकी गाडी होती. अचानक गाडी रस्त्यात बंद पडल्याने अडकून पडलेल्या चालकाच्या मदतीसाठी चक्क खासदार रस्त्यावर उतरुन अन्य दोन जणांबरोबर गाडीला धक्का मारतानाचा क्षण एका मुंबईकराने आपल्या मोबाईल कॅमेरात टिपला.
कल्याणमध्ये राहणाऱ्या केतन भोई नावाच्या मुळच्या अहमदनगरच्या तरुणाने फेसबुकवर हा फोटो शेअर केला आहे. केतनने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये तीन व्यक्ती रस्त्यावर उभ्या असलेल्या गाडीला धक्का देऊन सुरु करण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहेत. या फोटोला कॅप्शन देताना केतनने नेमकं काय घडलं हे सांगितलं आहे. "आज ऑफिस संपल्यानंतर कॅबने घरी जात असताना अंधेरी येथे तीन जण एका गाडीला धक्का देताना दिसले. मुंबईत असे प्रसंग फार कमी वेळा दिसतात त्यामुळे कुतूहलाने बघत होतो. तेवढ्यात लक्षात आलं की अरे यात मध्यभागी तर आपले नगरचे खासदार डॉ. सुजय विखे-पाटील (Dr Sujay Vikhe Patil) आहेत. पटकन फोटो काढायचा प्रयत्न केला पण नीट फोटो घेता आला नाही," असं या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये केतनने म्हटलं आहे.
पोस्टच्या शेवटी केतनने, "कुठलाही बडेजाव न करता नगरच्या बाहेर स्वतः रस्त्यावर उतरून एका अनोळखी व्यक्तीला मदत करणारे आमच्या नगरचे खासदार आहेत हे बघून अभिमान वाटला," असंही केततने म्हटलं आहे.
अनेकांनी सोशल मीडियावर या प्रसंगानंतर खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांचं कौतुक केलं आहे. लोकप्रतिनिधिकांसाठी डॉ. सुजय विखे-पाटील यांनी आदर्श घालून दिला आहे असं अनेकांनी या पोस्टवरील कमेंट सेक्शनमध्ये म्हटल्याचं दिसत आहे.