दिल्लीच्या शाहदरामध्ये आकाश शर्माचं कुटुंब दिवाळी साजरं करत होतं. पिवळ्या रंगाचा सदरा घालून ते सर्वजण फटाके वाजतत होते. त्याचवेळी स्कुटीवरुन दोघे येतात. यामधील एकजण स्कुटीवरुन खाली उतरतो आणि आकाश शर्माला त्याच्या घरासामोर गोळी घालून ठार करतो. आकाश शर्माचा भाचा हल्लेखोरांना पकडण्यासाठी त्यांच्या मागे धावला असता त्यालाही ठार करण्यात आलं. या घटनेनंतर आकाश शर्माच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी हत्येच्या मास्टरमाइंडला अटक केली आहे, जो एक अल्पवयीन मुलगा आहे.
शाहदरा येथील या हत्येचं सीसीटीव्ही समोर आलं आहे. सीसीटीव्हीत आकाश आणि त्यांचा भाचा ऋषभ दिसत आहे. दोघांनी पिवळा कुर्ता घातला आहे. ऋषभ फटाके फोडत असतानाच, दोन लोक स्कुटीवरुन येतात. आकाश काही वेळाने घरात जाताच स्कुटीवरुन एकजण बंदूक काढतो आणि गोळ्या घालतो. यानंतर जेव्हा भाचा शूटरला पकडण्यासाठी मागे पळतो तेव्हा त्यालाही गोळी घालतात.
Farsh Bazaar double murder cctv
A man and his cousin shot dead while celebrating Diwali. #delhimurder #DelhiPolice #Delhicrime pic.twitter.com/Z8b4iFkS3f— Shehla J (@Shehl) November 1, 2024
दिल्ली पोलिसांनी शाहदरा येथे झालेल्या गोळीबार प्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी सांगितलं की, गोळीबार केला जात असताना तो दुचाकीवर बसला आहे तो 16 वर्षांचा अल्पवयीन मुलगा आहे. तोच या हत्याकांडाचा मास्टरमाइंड आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी हत्येच्या 17 दिवस आधी योजना आखली होती. 2-3 दिवसांपासून ते आकाशची हत्या करण्याच्या हेतूने फिरत होते, पण तो सापडत नव्हता. स्कूटरवर बसलेल्या अल्पवयीन मुलानेच कोणाला गोळ्या घालायच्या आहेत हे सांगितलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलाने आकाशला काही पैसे दिले होते, मात्र आकाश पैसे परत करत नव्हता. यावरुन त्यांच्यात जोरदार भांडण सुरु होतं. आकाशवरही गुन्हे दाखल आहेत. त्याचं कुटुंब गुन्हेगारी स्वरूपाचं आहे. त्याचबरोबर अल्पवयीन मुलावरही गुन्हा दाखल आहे. अशा परिस्थितीत पोलीस वेगवेगळ्या बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणाचा कुठल्या मोठ्या गुन्ह्याच्या कटाशी संबंध आहे का? याचाही शोध पोलीस घेत आहेत. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र दिल्लीत भरदिवसा गोळीबाराच्या या घटनेने पुन्हा एकदा प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश शर्मा उर्फ छोटू आणि त्याचा भाचा ऋषभ शर्मा (16) यांचा मृत्यू झाला असून क्रिश शर्मा (10) गोळी लागल्याने जखमी झाला आहे. ते म्हणाले की, शाहदरा येथील भागात पीडित त्यांच्या घराबाहेर दिवाळी साजरी करत असताना रात्री 8 वाजता त्यांच्यावर हल्ला झाला. अधिकाऱ्याने सांगितले, रात्री 8.30 वाजता पीसीआर कॉल आल्यानंतर पोलिसांचे पथक पाठवण्यात आले. पथकाला घटनास्थळी रक्ताचा सडा आढळला.
प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितलं की, आरोपीने आकाश शर्मावर गोळी झाडण्यापूर्वी त्याच्या पायाला स्पर्श केला होता. गोळीबारानंतर सर्वांना रुग्णालयात नेण्यात आलं होतं. डॉक्टरांनी आकाश आणि ऋषभ यांना मृत घोषित केलं तर क्रिशवर उपचार सुरु आहेत. वैयक्तिक वैमनस्यातून हत्या झाल्याचं प्रथमदर्शी दिसत आहे. पीडितेच्या कुटुंबीयांचे जबाब नोंदवून घेतले जाणार असून यासंदर्भात तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.