मुंबई: विलेपार्ले पूर्व येथे एका घडलेल्या एका दुर्घटननेनंतर सर्वत्र एकच खळबळ माजल्याचं पाहायला मिळत आहे. मंगळवारी सायंकाळी .ही घडना घडली असून, विहिरीचा कठडा तुटून काही महिला विहिरीत कोसळल्याची दुर्घटना घडली.
फिरोजशहा मेहता मार्गावरील रूईया बंगल्याच्या आवारात हा प्रकार घडला. प्राथमिक माहितीनुसार, जितीया पूजेसाठी या महिला त्या ठिकाणी एकत्र आल्या होत्या. या पूजेतील धार्मिक विधीसाठी जवळपास २५ महिला विहिरीवर असलेल्या स्लॅबवर उभ्या होत्या. पण, त्याचवेळी हा कठडा कोसळला आणि ही दुर्घटना घडली.
हिंदू धर्मामध्ये जिवीत्पुत्रिका किंवा जितीया या व्रताचं फार महत्त्वं आहे. आपल्या मुलांच्या भल्यासाठी ही पूजा करत महिला उपवास करतात. आपली मुलं दीर्घायुषी व्हावीत याकरता हा निर्जळ उपवास ठेवला जातो.
तीन दिवस चालणाऱ्या या उपवासामधील दुसरा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा असतो. दुसऱ्या दिवशी हा उपवास करणाऱ्या महिला संपूर्ण दिवस आणि रात्री पाण्याचा एक थेंबही प्राशन करत नाहीत.
जितीया या उपवासाच्या कथेचं मूळ हे थेट महाभारतात जोडलं गेलं आहे. महाभारताच्या युद्धादरम्यान आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर अश्वत्थामा अतिशय निराश झाला होता. त्याच्या मनात सूडाच्या भावनेचा दाहसुद्धा सुरुच होता. याच सूडाच्या भावनेने तो पांडवांच्या शिबिरात गेला. शिबिरात पाच लोक निद्रावस्थेत होते. अश्वत्थामाला ते पांडवच असल्याचं वाटल्यामुळे त्याने त्या पाचही जणांना ठार केलं.
असं म्हटलं जातं की ज्या पाचजणांना अश्वत्थामाने मारलं ती द्रौपदीची मुलं होती. ज्यानंतर संतप्त अर्जुनाने अश्वत्थामाला कैद केलं. ज्यानंतर त्याच्या दिव्य शक्ती त्याच्यापासून हिरावून घेण्यात आल्या.
या साऱ्याचा सूड घेण्यासाठी म्हणून अश्वत्थामाने अभिमन्यूच्या पत्नीच्या गर्भात वाढणाऱ्या बाळाला मारण्याचा कट रचला आणि ब्रह्मात्र्याचा सहाय्याने त्याने भ्रूणहत्या केली.
त्याचवेळी श्रीकृष्णाने आपल्या दैवी शक्तींचा वापर करत त्या अर्भकाला पुन्हा जीवनदान दिलं. गर्भात पुनरुज्जिवीत झालेल्या या बाळाला याच कारणामुळे जिवीत्पुत्रिका हे नाव देण्यात आलं. त्या क्षणापासूनच आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी जितीया हा उपवास करण्याची प्रथा सुरु झाली असं म्हटलं जातं.