मुंबई : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (Krantijyoti Savitribai Phule) यांच्यावर आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या 'इंडिक टेल्स' (Indic Tales) या वेबसाईटवर (Website) कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मुख्य सचिव मनोज सौनिक यांना दिले आहेत. 'इंडिक टेल्स' या वेबसाईटने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी प्रसिद्ध केलेल्या लेखामध्ये त्यांच्याबद्दल अनेक आक्षेपार्ह गोष्टी लिहिल्या आहेत. या गोष्टीबाबत अनेक राजकीय, सामाजिक संस्थांनी शासनाकडे आक्षेप नोंदवले. या आक्षेपांची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वेबसाईटवरील मजकूर तपासून त्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश
महापुरुषांच्या बाबतीत लिखाण करताना ते अत्यंत अभ्यासपूर्ण असायला हवे, तसंच त्यामधून त्यांचा अवमान होणार नाही याची दक्षता लेखक किंवा प्रकाशन संस्थेने घेणे गरजेचे आहे. महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांची शासन गय करणार नाही, असा इशारा देतानाच 'इंडिक टेल्स' वरून लिहिण्यात आलेल्या लेखात काही आक्षेपार्ह बाबी असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अवमान प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आक्रमक झालीय.. इंडिक टेल्सविरोधात समता परिषद आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुंबई पोलीस आयुक्तालयासमोर निदर्शन करण्यात आली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसंच छगन भुजबळ आणि समीर भुजबळही निदर्शनात सहभागी झाले होते. 'इंडिक टेल्स' या वेबसाईटने आक्षेपार्ह लेख लिहून सावित्रीबाई फुलेंचा अवमान केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केलाय. याप्रकरणी मुंबई पोलीस आयुक्तांनाही कारवाईसंदर्भात निवेदन देण्यात आलं.
भुजबळांनी व्यक्त केली नाराजी
एकविसाव्या शतकात सुद्धा मनुवादी शक्ती पुन्हा एकदा सावित्रीबाई फुलेंवर चिखलफेक करीत आहे अशी टीका राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केली आहे. 'इंडिक टेल्स' पोर्टलवर इतिहासाची पुनर्मांडणी या नावाखाली इतिहासाची मोडतोड करण्यात आली आहे. ही समाजविघातक प्रवृत्ती ठेचण्याची आवश्यकता आहे. त्यामुळं सावित्रीबाई फुलेंच्या बदनामी बाबतचा हा विषय सरकारनं गांभीर्यानं घ्यावा अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली होती. तसंच हा अवमानकारक लेख लिहिणारी बेवसाईट आणि लेखकावर कठोरवाई कारवाईची मागणीही भुजबळ यांनी केली होती.
पुण्यात मुक निदर्शनं
दरम्यान, पुण्यात हडपसरमध्ये शिंदे फडणवीस यांच्या निषेधार्थ मूक आंदोलन केलं. राष्ट्रवादी काँग्रेसने अहिल्याबाई आणि सावित्रीबाईंचे पुतळे हटवण्यात आल्याच्या निषेधार्थ मुक आंदोलन केलं. सावरकर जयंतीदिनी महाराष्ट्र सदनात झालेला या राष्ट्रमातांचा अपमान सहन करणार नसल्याचं आंदोलनकर्त्यांनी सांगितलं.