close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

मध्य रेल्वेचं वेळापत्रक पुन्हा कोलमडलं; आज तर म्हणे.....

रोजचं रडगाणं प्रवाशांच्या डोईजड.

Updated: Jun 12, 2019, 10:10 AM IST
मध्य रेल्वेचं वेळापत्रक पुन्हा कोलमडलं; आज तर म्हणे.....

कपिल राऊत, झी २४ तास, ठाणे : पहाटेच्या सुमारास खर्डीजवळ इंजिन बंद पडल्यानं आज सकाळपासूनच मध्य रेल्वेचं वेळापत्रक पुन्हा कोलमडलंय. सलग तिसऱ्या दिवशी मध्य रेल्वेचं वेळापत्रकाचे तीन तेरा वाजल्यानं प्रवासी संतप्त झाले आहेत.

सततच्या खोळंब्याला कंटाळून प्रवासी संघटनांनी मध्यरेल्वेच्या डीआरएमला मंगळवारीच पत्र दिलं होतं. मात्र, आज पुन्हा एकदा मध्य रेल्वे खोळंबली. त्यामुळे आता प्रवाशांच्या संतापाचा कडेलोट होईपर्यंत प्रशासन वाट बघणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. 

मुंबईत पहिला पाऊस येतानाच दोन बातम्या घेऊन येतो. एक म्हणजे पाऊस आला ही बातमी आणि दुसऱी म्हणजे पहिल्याच पावसात मध्य रेल्वेची वाट लागली, ही दुसरी बातमी.गेल्या काही दिवसांत तर मध्य रेल्वेनं रखडमपट्टीचा कहर केला आहे. 

रोज 'मरे' त्याला कोण रडे ? 

'जी सुधरत नाही, तिला मध्य रेल्वे म्हणतात.....', 'रखडमपट्टीत मध्य रेल्वेचा अव्वल नंबर.....', 'पहिल्या पावसात मध्य रेल्वेचा का वाजतो बोऱ्या......'

गेली कित्येक वर्षं या टोमण्यांना प्रतिसाद आणि प्रवाशांच्या प्रश्नांना उत्तरं काही मिळालीच नाहीत. मान्सूनपूर्व पावसाच्या पहिल्याच सरीत मध्य रेल्वे रखडली, खोळंबली. सोमवारी रात्री कोपर स्थानकावर पेंटाग्रामफमधून ठिणग्या उडाल्या आणि मध्य रेल्वे पुरती गडबडली. मध्य रेल्वेची ही रखडमपट्टी मंगळवार सकाळपर्यंत कायम होती...

२१ मे- अंबिवली-टिटवाळा दरम्यान रुळाला तडा
२६ मे - कुर्ल्यात लोकलचं चाक घसरलं
२८ मे - कळव्यात सिग्नलमध्ये बिघाड, लोकल दोन तास उशिरानं
२९ मे - डोंबिवलीमध्ये तांत्रिप बिघाड, लोकल उशिरानं
३० मे - कळवा-मुंब्रा दरम्यान सिग्नल बिघडला, लोकल विस्कळीत
५ जून - डोंबिवलीत सिग्नल बिघडला, लोकलच्या ५० फेऱ्या रद्द
६ जून - खडवलीजवळ रुळाला तडा, ४० फेऱ्या रद्द
१५ दिवसांत मध्य रेल्वेवर जवळपास ६०० लोकल रद्द

लोकल उशिरा किती धावल्या, याची तर गणतीच नाही. मध्य रेल्वेच्या रडकथेची ही ताजी उदाहरणं... 

स. का. पाटील यांच्यापासून पियूष गोयल यांच्यापर्यंत आतापर्यंत मुंबईनं ७ ते ८ रेल्वेमंत्री दिले... पण मध्य रेल्वे सुधरलीच नाही.

पाऊस येणार आहे, हे काय 'मरे'ला माहीत नसतं का ?, मध्य रेल्वे रखडल्यावर मुंबईकराला किती उशीर होतो, याचा विचार केलाय का..., त्याला घर-दार आहे की नाही?, सहन करतो म्हणून मुंबईकराला किती गृहीत धराल...., सत्तर वर्षांत साधं रेल्वेचं वेळापत्रक पाळता येत नाही, हे पाप कुणाचं ? 

गर्दीत मरत मरत मध्य रेल्वेतून प्रवास करणाऱ्या मुंबईकरानं रोजच्या अस्वस्थतेतून केलेले हे सवाल आहेत.... उत्तरं द्य़ावीच लागतील. ते अनुत्तरित राहिले तर, एक दिवस उद्रेक अटळ असेल....