मुंबई जिल्हा सहकारी बँकेत पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांची हातसफाई!

मुंबै बॅंकेबाबत एक महत्वाची बातमी. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पदाधिकाऱ्यांचे नातेवाईकही हात साफ करून घेण्यात मागे राहिलेले नाहीत, हेच दिसून येत आहे 

Updated: Dec 25, 2018, 11:33 PM IST
मुंबई जिल्हा सहकारी बँकेत पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांची हातसफाई! title=

कृष्णात पाटील / मुंबई : मुंबै बॅंकेबाबत एक महत्वाची बातमी. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पदाधिकाऱ्यांचे नातेवाईकही हात साफ करून घेण्यात मागे राहिलेले नाहीत, हेच दिसून येत आहे. सामान्य लोकांच्या नावावर कर्जप्रकरणे करून त्याचा पैसा मात्र दुसरीकडं वळवला गेल्याचे समोर आले आहे. बँकेचे अध्यक्ष आणि भाजप आमदार प्रविण दरेकर यांच्या मेव्हण्याच्या खात्यावर यातील बराचसा पैसा वळता झाल्याचा आरोप होतो आहे.

अंधेरीला एका खासगी कुरियर कंपनीत कुरियर बॉय म्हणून नोकरी करणारे १५ जण गेल्या दीड दोन वर्षांपासून अन्यायाविरोधात दाद मागत आहेत. या सर्वांनी मुंबै बँक अध्यक्ष प्रविण दरेकरांचा मेव्हणा महेश पालांडेंच्या मदतीने मुंबै बँकेच्या कांदिवली ठाकूर व्हिलेज शाखेतून कर्जप्रकरणे केली. पगार कमी असतानाही क्षमतेपेक्षा अधिक रकमेची म्हणजे प्रत्येकी ३ लाखांचे कर्ज दोन दिवसांत मंजूरही झाले. परंतु त्यांच्या खात्यावरचा पैसा दुसऱ्यांच्या भलत्याच्याच खात्यावर वळवला गेला. 

यामधील काही पैसा हा दरेकांचा मेव्हणा महेश पालांडे आणि त्याच्या पत्नीच्या खात्यावरही वळवण्यात आल्याचे दिसून येते आहे. पैसे मिळालेले नसतानाही कर्ज फेडण्यासाठी बँकेकडून तगादा आणि नोटीसही यांना येते आहेत. बँक प्रविण दरेकर यांनीही ४ वेळा बैठक घेवून पैसे परत देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु ते त्यांनी पाळले नाही, अशी माहिती पिडीत कर्जदार विनायक जाधव, जगन्नाथ कोंडविलकर आणि सुरेश कदम यांनी दिलेय.

नाबार्डच्या अहवालामध्येही या प्रकरणाचा उल्लेख मनी लाँड्रिंग असा केला आहे. बँकेने याप्रकरणी एका शाखाधिकाऱ्याला निलंबित केले आहे. परंतु दुसरीकडे अध्यक्षांचा मेव्हणा असल्याने त्याला वाचवले जाते आहे का, असा प्रश्न उपस्थित होतोय. तसेच हा १० कोटीपर्यंतचा गैरव्यवहार असल्याचा शिवसेनेने केलाय. प्रविण दरेकरांनी मात्र असा पैसा वळता झाल्याचे माहित नसल्याचे सांगत दोषींवर कारवाई करणार असल्याचे सांगितले.

धक्कादायक म्हणजे याप्रकरणी कांदिवलीचे समतानगर पोलीस तक्रारही दाखल करून घेत नाही, अशी माहिती पुढे आलेय. मात्र, १५ जण गेल्या दीड - दोन वर्षांपासून लढा देत आहेत, परंतु त्यांना अद्याप यश आलेले नाही.