JJ Hospital resident doctors on strike : मुंबईतल्या प्रसिद्ध जे.जे. रुग्णालयात डॉक्टर्समधल्या वॉरमुळे रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. जेजेतल्या 750 निवासी डॉक्टर्सनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. डॉ. तात्याराव लहाने तसेच नेत्र विभागाच्या प्रमुख डॉ. रागिणी पारेख यांच्यावर या निवासी डॉक्टर्सनी गंभीर आरोप केले आहेत. दुसरीकडे या आरोपांआधीच डॉ.लहाने आणि डॉ. रागिणी पारेख यांच्यासह जे.जेच्या 9 वरिष्ठ डॉक्टर्सनी तडकाफडकी राजीनामे दिले आहेत. या सर्व वरिष्ठ डॉक्टर्सनी जे जे रुग्णालयाच्या डीन डॉ. पल्लवी सापळे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, निवासी डॉक्टर आणि रुग्णालयाच्या अधिष्ठाता यांच्या छळाला कंटाळून राजीनामा दिला असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, निवासी डॉक्टर्स विरुद्ध लहाने विरुद्ध डीन या संघर्षात रुग्णांना मात्र याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
माजी डीन डॉ. तात्याराव लहाने आणि नेत्ररोग विभागाच्या प्रमुख डॉ. रागिणी पारेख यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. कारवाईच्या मागणीसाठी जेजे रुग्णालयातील सुमारे 750 निवासी डॉक्टर बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. आरोग्य सेवांचे सुरळीत कामकाज सुनिश्चित करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळाची व्यवस्था करण्यासाठी, रुग्णालयाने बृहन्मुंबई महानगरपालिका संचालित इतर रुग्णालयांशी संपर्क साधण्यात येत आहे.
22 मे रोजी रुग्णालयातील 22 निवासी डॉक्टरांनी डॉ. लहाने आणि डॉ. पारेख यांच्याविरुद्ध मार्ड संघटनेमार्फत अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर काल डॉ. तात्याराव लहाने सोबत डॉ. शशी कपूर, डॉ. दीपक भट, डॉ. सायली लहाने, डॉ. रागिणी पारेख, डॉ. प्रीतम सामंत, डॉ. स्वरांजित सिंग भट्टी, डॉ. आश्विन बाफना आणि डॉ. हेमालिनी मेहता या 9 जणांनी आपले राजीनामे दिले आहेत.
सर समूह जे.जे रुग्णालयाचीत ऑप्थेलमोलॉजी विभागातील डॉ. तात्याराव लहाने यांनी 'झी 24 तास'ला माहिती देताना सांगितलं की, 6 महिन्यांपूर्वी रुजू झालेल्या निवासी डॉक्टरांनी मोतिंबिंदू शस्त्रक्रिया करण्यास दिल्या जात नाही, अशी तक्रार अधिष्ठात्यांकडे आली होती. मात्र तिसऱ्या वर्षांच्या विद्यार्थ्यांना मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिकवली जाते. या विद्यार्थ्यांना ही शस्त्रक्रिया शिकवण्यात येणार होती, मात्र अधिष्ठात्यांनी या प्रकरणात खतपाणी घालून मुलांना संपावर जाण्यापर्यंत मदत केली.
याबाबत चौकशी नेमण्यात आली आहे. मात्र, चौकशी अधिकारी नेमले असताना, आम्ही ते बदलण्याची मागणी केली होती. दरम्यान यावेळी चौकशी अधिकाऱ्यांनी एकतर्फी अहवाल सादर केला. रात्रंदिवस काम करणाऱ्या या डॉक्टरांना कोणी बाजू मांडण्यास देत नसेल तर त्याठिकाणी काम करण्यास काही अर्थ नाही. त्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून सामूहिक राजीनामा दिला आहे, असेही डॉ. लहाने यांनी सांगितलं आहे.