मराठीतून बोलण्यास सराफाचा नकार, लेखिकेचा दुकानाबाहेर ठिय्या

लेखिका शोभा देशपांडे यांचे कुलाबा इथल्या महावीर ज्वेलर्स बाहेर ठिय्या आंदोलन

Updated: Oct 9, 2020, 01:04 PM IST
मराठीतून बोलण्यास सराफाचा नकार, लेखिकेचा दुकानाबाहेर ठिय्या title=

मुंबई : मराठी लेखिका शोभा देशपांडे यांनी कुलाबा इथल्या महावीर ज्वेलर्स बाहेर ठिय्या आंदोलन केलंय. सराफ दुकानदार मराठीमध्ये बोलला नाही आणि मराठी बोलण्यास सांगितल्यावर हुज्जत घातली असा आरोप देशपांडे यांनी केलाय. काल रात्री पासून लेखिका देशपांडे यांचे ज्वेलर्स बाहेर ठिय्या आंदोलन सुरु आहे.

पोलिसांकडून आपल्याला चांगली वागणूक मिळाली नसल्याचे शोभा देशपांडे म्हणाल्या. दरम्यान शोभा देशपांडे यांची भूमिका कौतूकास्पद असून काही वेळात आपण तिथे पोहोचत असल्याचे खासदार अरविंद सावंत यांनी म्हटले. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोभा देशपांडे यांच्या सोबत फोनवरून संवाद साधल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली.  मुख्यमंत्र्यांनी शोभा देशपांडे यांचे म्हणणे ऐकून घेतले. तुमचे म्हणणे योग्य आहे. मुद्दा रास्त आहे. प्रकृतीची काळजी घ्या असे मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितले. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि मनसे पदाधिकाऱ्यांनी ज्वेलर्स इथे जाऊन त्यांची भेट घेतली.

मी टॅक्सीतून खाली उतरले. मला कानातले घ्यायचे होते. म्हणून मी महावीर ज्वेलर्समध्ये गेले. तो माझ्या हिंदीतून बोलायला लागला. मराठी तूला बोलता येत नाही. तू दुकान कसं उघडलं ? असा प्रश्न देशपांडे यांनी विचारला. तुम्हाला हिंदी बोलता येत नाही, तुम्ही मराठीत बोलता म्हणून मी तुम्हाला रिंग विकणार नाही असे दुकानदार म्हणाला. 

यानंतर शोभा देशपांडे यांनी त्याच्याकडे दुकाना परवान्याची मागणी केली. जोपर्यंत लायसन्स दाखवत नाही तोपर्यंत मी जाणार नाही अशी भूमिका देशपांडेंनी घेतली आणि पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी देखील हिंदीमध्ये बोलत मलाच दाटवण्यास सुरुवात केल्याचे त्या म्हणाल्या. 

आठवलेंची टीका 

फक्त मराठी बोलावं हे संविधान विरोधी आहे. मराठी बोलणं सक्तीचं करता येणार नाही असे विधान केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आणि आरपीआय प्रमुख रामदास आठवले यांनी म्हटलंय. शिवसेनेच्या उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीयांचे युनिट आहेत. मग ते सगळे मराठी बोलतात का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. मराठी मुद्द्यावरुन शिवसेना राजकारण करत असल्याची टीका त्यांनी केलीय.