मुंबईकरांपर्यंत भेसळयुक्त दूध पोहोचवणाऱ्या पुतना मावशींवर FDAनं आवळले पाश

महाराष्ट्रात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे मुंबईला दूध पुरवठा कमी होत आहे. 

Updated: Jul 27, 2021, 08:58 PM IST
मुंबईकरांपर्यंत भेसळयुक्त दूध पोहोचवणाऱ्या पुतना मावशींवर FDAनं आवळले पाश
प्रतिकात्मक छायाचित्र

प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई : राज्यात आलेल्या पुरामुळे मुंबईत दुधाचा ओघ घटलाय. याचा फायदा उठवत काही ठकसेन भेसळयुक्त दूध तुमच्या गळ्यात मारू पाहतायत. विषारी दूध पाजणा-या या पुतना मावशींवर FDAनं पाश आवळलेत. 

महाराष्ट्रात कोरोनामुळे बेकारी आणि त्यातच पावसाचा कहर त्यामुळे सामान्य माणसाचे अर्थचक्र बिघडले आहे, मात्र काही महाभाग या परिस्थितीचा गैरफायदा घेत लोकांच्या जीवाशी खेळत आहेत. भेसळ करून आपला खिसा गरम करताना लोकांच्या जीवाशी खेळत आहेत

आधीच करोनाचे संकट त्यात महाराष्ट्रात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे मुंबईला दूध पुरवठा कमी होत आहे. त्याचाच फायदा काही जण घेत आहेत, मुंबईच्या मालाड आणि गोवंडी येथे धाड टाकून दुधात पाणी आणि भेसळ करणाऱ्यांवर अन्न आणि औषध प्रशासनाने मुंबई पोलिसांच्या मदतीने कारवाई केली आहे. दुधाची भेसळ करणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासनाची धडक मोहीम हाती घेत मालाड आणि गोवंडी भागात कारवाई केली आहे. 

या प्रकरणात मालाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला असून एकाला अटक केली आहे तर 88 लिटर पेक्षा जास्त दूध जप्त केले आहे, तर गोवंडी येथील दूध डेरीचे नमुने तपासणी साठी पाठवले आहेत. या डेरीत दुधाच्या टँकरमध्ये पाणी मिसळत तो मुंबईत वितरण करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार कारवाई करत नमुने घेतले आहेत.

 अन्न आणि औषध प्रशासनाने दूध भेसळ होऊ नये या करीता मुंबई परिसरात कारवाई आणि प्रतिबंधक उपाय योजना करत असते. ब्रॅण्डेड दुधाच्या पिशव्या मधून दूध काढून पाणी घालून भेसळ करणाऱ्या 16 जणांवर मागील दोन महिन्यात धाड टाकण्यात आली होती. या कारवाईमध्ये 2318 लिटर भेसळ युक्त दुध केले नष्ट करण्यात आले होते. 1 लाख 18 हजार 898 रुपये इतकी या दुधाची किंमत होती. 

प्रशासन अशा महाभागांचा पाठपुरावा घेत आहेच. पण, अशातही नागरिकांनीही जागरूक राहून अशा भेसळ करणाऱ्यांवर लक्ष ठेवले पाहिजे. जर भेसळ युक्त दूध वाटले तर त्याच्या तपासणीसाठी अन्न आणि औषध प्रशासनाला तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. 

काही पैशांकरता दुधात भेसळ करणारे हे एखाद्याच्या मृत्यूलाच जवाबदार असतात कारण अशा भेसळयुक्त दुधामुळे जीवघेणे आजार होतात त्यामुळे या लोकांवर कडक कारवाई होणे अपेक्षित आहे. 

FDAचं 'ऑपरेशन पुतना मावशी'
मुंबईत दूध भेसळ तशी नवी नाही, मात्र आता ऐन महापुराच्या संकटात या भेसळमाफियांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुरामुळे मुंबईचा दूधपुरवठा कमी झालाय. याचाच फायदा घेऊन दूध भेसळ माफिया सक्रीय झालेत. या माफियाविरोधातं अन्न आणि औषध प्रशासनानं मोठी मोहीम हाती घेतलीये. सोमवारी मालाड आणि गोवंडीमध्ये धाडी टाकत भेसळयुक्त दुधाचा साठा जप्त केलाय. मालाडमध्ये 88 लीटरपेक्षा जास्त भेसळयुक्त दूध जप्त करण्यात आलं. या कारवाईत एकाला अटक करण्यात आलीये.

मागील दोन महिन्यांत FDAनं 16 ठिकाणी धाड टाकल्या. यावेळी तब्बल 2 हजार 318 लीटर भेसळयुक्त दूध नष्ट करण्यात आलं. या दुधाची किंमत 1 लाख 18 हजार 898 रुपयांच्या घरात होती. तर, जकात नाक्यांवर 170 वाहनं आतापर्यंत तपासण्यात आली. 253 नमुन्यांपैकी 7 प्रकरणांमध्ये दूधाचा दर्जा कमी आढळला. या कारवाईत 1 लाख 71 हजार 600 रुपये किंमतीचं 3 हजार 632 लीटर दूध परत पाठवण्यात आलं.

थोड्याशा पैशांसाठी चिमुरड्यांच्या तोंडात विष देणा-यांना रोखणं गरजेचं आहे. आपणही जागरूक राहिलं पाहिजे. तुम्हाला काही शंका आली, तर लगेच पोलीस किंवा अन्न औषध प्रशासनाशी संपर्क साधा आणि या भेसळमाफियांना अद्दल घडवा.