मुंबई महापालिका बजेट : 500 चौरस फुटापर्यंत मालमत्ता करातून सूट, पण...

मुंबई महापालिकेचा 2021-2022 (Mumbai Municipal Budget 2021) या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प ((Mumbai Budget) आज महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी सादर केला.  

Updated: Feb 3, 2021, 04:36 PM IST
मुंबई महापालिका बजेट : 500 चौरस फुटापर्यंत मालमत्ता करातून सूट, पण...  title=

मुंबई : मुंबई महापालिकेचा 2021-2022 (Mumbai Municipal Budget 2021) या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प ((Mumbai Budget) आज महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी सादर केला. दरम्यान, शिवसेनेने पुन्हा एकदा मालमत्ता कराबाबत मुंबईकरांची निराशा केली आहे. 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता घरातील सर्वसाधारण करातून सूट दिली आहे. संपूर्ण मालमत्ता कर माफ करण्यात आलेला नाही. त्यातील केवळ सर्वसाधारण कर माफ करण्यात आल्याचे पुन्हा एकदा जाहीर करण्यात आले आहे.

दरम्यान, यंदा मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प 39, 38 ,83 कोटी रुपयांचा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत अर्थसंकल्पात यंदा 16.74 टक्के वाढ झाली आहे. हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा अर्थसंकल्प आहे. महापालिकेनं यंदा घरांच्या मालमत्ता करात कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील वर्ष करोना संकटांशी दोन हात करण्यात गेलं त्यामुळं गतवर्षीच्या तुलनेत महसूल उत्पन्नात 636. 73 कोटींनी घट झाली आहे. कोस्टल रोड प्रकल्पासाठी दोन हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. गोरेगाव मुलुंड लिंक रोडसाठी 1300 कोटी,  बेस्ट उपक्रमासाठी 750 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच रखडलेल्या रुग्णालयाची दुरुस्ती करण्यावर भर देण्यात आला आहे. नव्या रुग्णालयाची उभारणी करण्यात येणार आहे.

शिक्षण मंडळाचा अर्थसंकल्प

मुंबई महापालिकेच्या शाळा आता मुंबई पब्लिक स्कूल नावाने नव्या लोगोसह ओळखल्या जाणार. 963 प्राथमिक आणि 224 माध्यमिक शाळा पालिकेच्या आहेत. मुंबई महापालिका शिक्षण समितीचा अर्थसंकल्प आज सादर झाला. मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीचे बजेट यंदा 2945.78 कोटी रूपयांचे. मागील वर्षी 2944.59 कोटींचे होते

नव्या 24 माध्यमिक शाळा यंदा सुरू केल्या जाणार आहेत. कोविड काळात शाळा सुरू करताना मुलांना कोरोनाची लागण होवू नये म्हणून सॅनिटायझर, मास्कसाठी 15.90 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर सीबीएसई बोर्डाच्या 10 नवीन शाळा सुरु करण्यात येणार आहेत. याकरिता 2 कोटी रूपयांची तरतूद केली आहे. शहरात दोन, पश्चिम उपनगरात तीन व पूर्व उपनगरात पाच शाळा असतील.

मुंबई महापालिकेतील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या 27 शालेय वस्तूंसाठी 88 कोटींची तरतूद. उच्च माध्यमिक शाळांमधल्या विद्यार्थ्यांसाठी  करिअर कौन्सिलिंग कार्यक्रम Whatsapp आणि Chat bot द्वारे राबवणार. वैयक्तिक मार्गदर्शनासाठी मे 2021 पासून `करिअर टेन लॅब´ या संस्थेमार्फत नियोजन असणार आहे. ज्यामध्ये महाविद्यालयिन प्रवेश प्रक्रीया पार पाडण्याकरता मार्गदर्शन केले जाईल. 21.10 लाखांची तरतुद करण्यात आली आहे.

24 विभागनिहाय संगीत अकादमी अंतर्गत मयुरेश पै यांच्या मार्गदर्शनाखाली एन एम जोशी शाळेत मॉडेल संगीत केंद्र उभारले जाणार. याकरिता 10 लाखांची तरतूद. तर महापालिका शाळेतील 1300 वर्गखोल्या डिजीटल क्लासरुम अंतिम टप्प्यात. तरतुद 28.58 कोटींची तरतुद करण्यात आली आहे.

आरोग्य सेवा- सुविधांसाठी खर्चात वाढ

 कोरोनाचं संकट कायम आहे. या संकटाचा सामना करताना महापालिकेला आरोग्य सुविधांवर सर्वाधिक खर्च करावा लागला होता. त्यामुळे या अर्थसंकल्पात आरोग्य सेवा- सुविधांसाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक वाढ करण्यात आली आहे. आरोग्य विभागासाठी 4 हजार 760 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 500  कोटींची वाढ करण्यात आली आहे. तर निधन झालेल्या कोविड योद्धांच्या कुटुंबीयांना 50 लाख सानुग्रह मदत देण्यात येणार आहे.

दरम्यान, मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प मांडण्यास सुरूवात झाल्यावर थोडा गोंधळ झाला. अर्थसंकल्पात शिक्षण मंडळाचं बजेट मांडत असताना महापालिका सहआयुक्त रमेश पवार हे पाणी समजून सॅनिटायझर प्यायले. सर्व अधिकाऱ्यांच्या समोर सॅनिटायझरच्या बाटल्या ठेवण्यात आल्या होत्या. या सॅनिटायझरच्या बाटल्यांचा आकार पाण्याच्या बाटल्यांसारखाच होता. त्यामुळे अनवधानाने सहआयुक्तांनी सॅनिटायझरची बाटली उचलून पाणी पिण्याचा प्रयत्न केला. मात्र तातडीने ही बाब लक्षात येताच ते बाजूला जाऊन चुळा भरून पुन्हा येऊन बसले. त्यानंतर सर्व अधिकाऱ्यांसमोर पाण्याच्या बाटल्या मांडण्यात आल्या.