मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आज ओबीसी आणि सर्वसाधारण महिलांसाठीही नव्याने सोडत

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ओबींसीसह घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने आता पुन्हा एकदा सोडत काढली जाणार आहे.

मेघा कुचिक | Updated: Jul 29, 2022, 08:17 AM IST
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आज ओबीसी आणि सर्वसाधारण महिलांसाठीही नव्याने सोडत title=

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ओबींसीसह घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने आता पुन्हा एकदा सोडत काढली जाणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आज सोडत काढली जाणार आहे. आधीच्या सोडतीतील सर्वसाधारण महिला सोडत रद्द केली जाणार आहे. आता उद्या ओबीसी पुरुष, ओबीसी महिला, सर्वसाधारण पुरुष आणि सर्मवसाधारण महिला यांच्यासाठी पुन्हा सोडत काढली जाणार आहे. 

यामुळे आता इच्छुकांमध्ये धाकधूक, चिंता आणि उत्सुकता असं काहीसं वातावरण निर्माण झालं आहे. 31 मे रोजी काढण्यात आलेल्या लॉटरीमध्ये अनेक दिग्गजांना आपले वॉर्ड गमवावे लागले होते. आता पुन्हा एकदा सोडत होणार असल्याने काही जणांमध्ये आशा निर्माण झाली आहे. 

मुंबई महापालिकेत 9 वॉर्डस वाढले आहेत. यामुळे यावेळी मुंबई महापालिकेत 63 जागांवर ओबीसी आरक्षण जाहीर होणार आहे. यंदाच्या सोडतीतही गेल्या तीन निवडणुकीतील पुरुष ओबीसी आरक्षण जाहीर झालेल्या प्रभागात महिला आरक्षण जाहीर करण्यासाठी प्राधान्यक्रम ठरवला जाणार आहे. 

आरक्षण सोडतीचे वेळापत्रक

आज सकाळी ११.०० वा.

ठिकाण - बालगंधर्व रंगमंदिर, तळमजला, ऑडीटोरियम हॉल, रोड क्र. २४ व ३२ च्या नाक्याजवळ, नॅशनल कॉलेजच्यासमोर, बांद्रा (प.), मुंबई

दरम्यान अनुसूचित जाती, अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती आणि अुसूचित जमाती महिला यांच्या सोडतीमध्ये कोणताही बदल होणार नाही. त्यांचे आरक्षण हे लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने होत असल्याने आणि यांच्यासाठी जागा राखून ठेवल्यामुळे त्यांच्या आरक्षणात कोणाताही बदल होणार नाही. त्यामुळे त्यांचे आरक्षण हे ३१ मे २०२२ रोजी काढलेल्या सोडतीनुसारच कायम राहणार आहे. 

मुंबई महापालिका लोकसंख्या, जागा आणि प्रभाग

एकूण लोकसंख्या – १ कोटी २४ लाख ४२, ३७३

एस. सी. – ८ लाख ३ हजार २३६

एस. टी. – १ लाख २९ हजार ६५३

--------------------------------------------------------------

एकूण जागा – २३६

महिला आरक्षित – ११८

---------------------------------------------------

एकूण जनरल जागा – १५६

जनरल महिला जागा – ७७

-------------------------------------------------------

एकूण ओबीसी जागा – ६३

 ओबीसी महिला जागा  – ३२

 एकूण एस. सी. जागा – १५

एस. सी. महिला जागा – ८

----------------------------------------------

एकूण एस. टी. जागा – २

एस. टी. महिला जागा – १