मुंबई : यंदाच्या वर्षी नोव्हेंबर महिना उजाडला तरीही वरुणराजा मात्र काढता पाय घेण्याच्या विचारात दिसत नाही. लांबलेलं पर्जन्यमान पाहता शेतीसोबतच आता भाज्या आणि मासे व्यवसायांवरही याचे थेट परिणाम दिसू लागले आहेत. सहसा काही दिवस वगळता भाज्या आणि माशांचे दर हे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे असतात. पण, यावेळी मात्र या दरांनीही चांगलीच उंची गाठली आहे.
दिवाळी आणि त्यामागोमागच्या दिवसांमध्ये कोसळणाऱ्या अवेळी पावसाचा फटका पालेभाज्या आणि फळभाज्यांच्या पिकांवर झाला आहे. परिणामी मेथी, कोथिंबीर, माठ, टोमॅटो, फ्लॉवर, गवार अशा भाज्यांचे दर अनेकांच्या भुवया उंचावत आहेत.
फक्त शाकाहाऱ्यांसाठीच नव्हे तर, मांसाहार आणि विशेषत: मासेप्रेमींनाही आता त्यांच्या जीभेचे चोचले आवरेत घ्यावे लागत आहेत. वारंवार मिळणारे चक्रीवदळाचे संकेत आणि त्यामुळे बंदरावरच थांबलेल्या मासेमारांच्या नौका यांमुळे बाजारात मासळीचे दर कडाडले आहेत.
काही ठिकाणी तर, ताज्या मासळीच्या पुरवठ्या अभावी साठवणीतील अर्थात बर्फातील मासे ग्राहकांच्या पानात वाढले जात आहेत. कोळंबी, सुरमई, पापलेट आणि इतरही प्रकारचे मासेही सध्या दुपटीच्या दराने उपलब्ध आहेत. साधारण दीडशे ते दोनशे रुपयांच्या किमतीला मिळणाऱ्या कोळंबीसाठी ग्राहकांना आता ३५० ते ४०० रुपये मोजावे लागत आहेत.
मासेप्रेमींना हे दर पाहून, त्यांचा हात आवरता घ्यावा लागत आहे. पुढील काही दिवसांसाठीही वेधशाळेकडून पुरवण्यात आलेल्या चक्रीवादळाच्या संकेतांनुसार मासेमारांना समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. तेव्हा आता दरांमध्ये केव्हा कपात होते याकडेच सर्वसामान्यांचं लक्ष असेल.