close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

पोलिसांना सापडली डी गँगची 'ती' रायफल

कुख्यात गुंड दाऊद इब्राहीमचा हस्तक नईम खानच्या घरातून ठाणे पोलिसांनी एके ५६ जप्त केली आहे. 

Updated: Jul 12, 2018, 09:59 PM IST
पोलिसांना सापडली डी गँगची 'ती' रायफल

मुंबई: १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींना शिक्षा झाल्या तरी अजून त्या स्फोटांशी संबंधित गोष्टींचा नव्याने उलगडा होत आहे. आता कुख्यात गुंड आणि दाऊदचा हस्तक नईम खानच्या घरात सापडलेल्या एके ५६ रायफलीचे लागेबांधे १९९३ च्या स्फोटांशी असण्याची शक्यता आहे. कुख्यात गुंड दाऊद इब्राहीमचा हस्तक नईम खानच्या घरातून ठाणे पोलिसांनी एके ५६ जप्त केली आहे. या एके ५६ रायफलीलाल १९९७च्या वृत्तपत्रात गुंडाळण्यात आले होते. या रायफलीवर गंजही चढलाय. ही रायफल १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातली असण्याची शक्यता आहे.

ही रायफल चिनी बनावटीची आहे. बॉम्बस्फोटात सापडलेल्या शस्त्रसाठ्यातल्या एके ५६ ही चिनी बनावटीच्या असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. तसेच त्या शस्त्रसाठ्यातल्या रायफल्स आणि नईम खानची रायफल यांच्यावरची चिनी अक्षरही मिळतीजुळती आहेत. या रायफलमधून शेवटची गोळी कधी झाडली गेली असावी, याची सध्या तपासणी केली सुरु आहे. अटकेत असलेल्या यास्मीन खानचा १९९९ ला नईमशी विवाह झाला. तेव्हापासून ही रायफल घरात आहे. 

दरम्यान, इक्बाल कासकरच्या अटकेनंतर ठाणे पोलिसांनी डी कंपनीविरोधात उघडलेल्या मोहिमेमुळे या गँगचे शूटर रातोरात अंडरग्राऊंड झालेत. त्यामुळे इक्बाल खंडणी प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेले शार्प शूटर शम्मी आणि गुड्डू यांच्यासह डझनभर गुंड अजूनही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. ठाणे पोलिसांनी डी कंपनीच्या काळ्या धंद्या विरोधात उघडलेल्या मोहिमेमुळे शूटर मंडळी अंडरग्राऊंड झाली असून त्यांना शोधण्यासाठी बरीच दमछाक करावी लागत असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. मात्र, १९९३ ची हत्यारं अजूनही सापडत असल्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती केवढी होती हे लक्षात येईल.