Mumbai pollution: मुंबईकरांनो, सावधान... मोकळ्या हवेत श्वास घेण्यासाठी तुम्ही मॉर्निंग वॉकला जात असाल, तर आधी ही बातमी पाहा. तुमचं आरोग्य सुधारण्याऐवजी हा मॉर्निंग वॉक तुमच्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकतो. कारण गेल्या काही महिन्यांपासून मुंबईतील हवेत प्रदूषण वाढलंय. जिकडं पाहावं तिकडं धुळीचं साम्राज्य पसरलंय...
मुंबईत आजमितीला साडेतीन हजारांहून अधिक बांधकामं सुरू आहेत. शिवाय रस्त्यांचं क्राँक्रिटीकरण, सुशोभिकरण, मेट्रो आणि कोस्टल रोडची कामं यामुळं मुंबईतली धूळ वाढली आहे. त्याचा थेट परिणाम मुंबईकरांच्या आरोग्यावर होतोय. अनेक मुंबईकर श्वसनाच्या आजारांनी बेजार झालेत.
मुंबईच्या खराब हवेचा मुद्दा अधिवेशनातही गाजला. मुंबईतल्या आमदारांनी या महत्त्वाच्या विषयाकडे सरकारचं लक्ष वेधलं...
दरम्यान, मुंबईतला हवेचा खालावलेला दर्जा सुधारण्यासाठी मुंबई महापालिकेनं तातडीनं समिती स्थापन केली आहे. मुंबई महापालिका 14 स्मॉग टॉवर आणि 5 एअर प्युरीफायर उभे करणार आहे. मात्र, कोट्यवधी रुपये खर्च करून उभ्या करण्यात येणाऱ्या या यंत्रणा खरंच उपयोगी ठरतील का, याबाबत तज्ञांना शंका आहे.
महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेली ही मुंबई महानगरी. पण सध्या खराब हवेनं या आंतरराष्ट्रीय शहराचा श्वास गुदमरून टाकलाय.. ही हवा पुन्हा स्वच्छ कधी होणार, याची मुंबईकर वाट पाहतायत.