म्हणून 'मुंबईचा राजा' साजरे करणार 'वेलिंग दशक'

 मंडळातर्फे पुढची दहा वर्षे 'वेलिंग दशक' म्हणून साजरे केले जाणार आहे.  यामागेही गौरवशाली इतिहासाचे कारण आहे.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Aug 28, 2017, 04:15 PM IST
म्हणून 'मुंबईचा राजा' साजरे करणार 'वेलिंग दशक' title=

मुंबई : लालबागमधील सर्वात पहिला सार्वजनिक गणपती असलेला 'लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ' म्हणजेच 'मुंबईच्या राजा'चा यंदा ९०वा गणेशोत्सव सोहळा साजरा होत आहे.

साधारण ९ दशकाहून अधिक काळ भक्तांच्या मनावर राज्य करणारा हा बाप्पा यापुढे आपल्याला अनोख्या रुपात दिसणार आहे. मंडळातर्फे पुढची दहा वर्षे 'वेलिंग दशक' म्हणून साजरे केले जाणार आहे.  यामागेही गौरवशाली इतिहासाचे कारण आहे. 

चार आणेतून सुरुवात

सुरुवातीला पाच दिवसाच्या असणाऱ्या उत्सवात भजन, किर्तन, भारुड इ. कार्यक्रम होत असत. या उत्सवाच्या माध्यमातून व्यापारी वर्गाने मराठी माणसाला मोठ्या प्रमाणात एकत्र आणण्याचे काम केले आहे. व्यापारी वर्गाच्या चार आणे वर्गणीतून हा उत्सव सुरु झाला आहे. आता मुंबईतील सर्वात मोठ्या उत्सव मंडळामध्ये या उत्सवाचे नाव घेतले जाते. 

२२ फूटी भव्य मूर्ती 

१९२८ साली लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाची स्थापना पेरूचाळ येथे करण्यात आली. दरम्यानच्या काळात मंडळातर्फे चलचित्र, देखावे सादर केले जात होते. पण मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात यापेक्षा काहीतरी वेगळे करण्याची कार्यकर्त्यांची इच्छा होती.

त्यावेळी दिनानाथ वेलिंग नावाचा 'अवलिया मूर्तिकार' मंडळाच्या कार्यकर्त्यांना भेटला. त्याने २२ फूटी भव्य अशी मूर्ती भक्तांच्या भेटीस आणली. २२ फूटी मूर्ती ही मंडळाची ओळख बनली आणि दिनानाथ वेलिंग हे मंडळाचे मूर्तिकार. 

वेलिंग दशक

यंदा हे मंडळ ९०वे वर्ष साजरे करत आहे. मूर्तिकार दिनानाथ वेलिंग यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी पुढचे दशक वेलिंग यांनी त्यांच्या कारकिर्दित साकरलेल्या मुर्ती पुन्हा साकरण्यात येणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष किरण तावडे यांनी सांगितले. १९७७ ते १९८९ दरम्यान दिनानाथ वेलिंग यांच्या हातून घडलेल्या आणि ऐतिहासिक ठरलेल्या निवडक दहा मूर्ती बाप्पाच्या भाविकांना पुन्हा पाहता येणार आहेत.

या मूर्ती नेमक्या कोणत्या असतील याबद्दलची माहिती मंडळातर्फे गुलदस्त्यातच ठेवण्यात आली आहे.