मुंबई : इराणी कॅफे संस्कृतीमधील एक अतीशय लोकप्रिय नाव आणि खवय्याच्या आवडीचं व्यक्तीमत्त्वं असणाऱ्या बोमन कोहिनूर यांचं नुकतच निधन झालं. पारसी जनरल रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या क्षणी ते ९७ वर्षांचे होते. मुंबईतील बॅलार्ड पियर येथे असणाऱ्या इराणी- पारसी कॅफे, ब्रिटानिया एँड कं. रेस्टॉरंटमध्ये येणाऱ्या अनेकांची मनं ते जिंकत होते.
१९२३ मध्ये इराणहून आलेल्या राशिद कोहिनूर यांनी या हॉटेलची सुरुवात केली होती. ते संपूर्ण कुटुंबासह काही धार्मिक कारणांमुळे इराणहून मुंबईत आले होते. त्याच वर्षी बोमन यांचा जन्म झाला. एका अपघातामध्ये वडिलांचं निधन झाल्यानंतर बोमन यांनी या हॉटेलची सर्व जबाबदारी स्वीकारली होती. अनेक दशकांसाठी ते या हॉटेलची जणू एक ओळख झाले होते. इथे भेट देणाऱ्या खवय्यांसोबतच परदेशी पर्यटकांशी दिलखुलासपणे संवाद साधण्याला ते कायम प्राधान्य देत.
इतकच नव्हे, तर या हॉटेलमध्ये आल्यावर कोणता पदार्थ मागवावा याचा सल्लाही देत. या साऱ्याला अर्थातच जोड होती ती म्हणजे बोमन कोहिनूर सांगत असणाऱ्या काही आठवणी आणि किस्स्यांची. नव्वदी ओलांडल्यानंतरही ते या हॉटेलमध्ये दररोज येत असत. वाढतं वय त्यांचा उत्साह काही कमी करु शकलं नव्हतं.
ब्रिटनच्या राजघराण्यातील प्रिन्स विलियम आणि त्यांची पत्नी, केट मिडलटन यांनी ताज महाल पॅलेस हॉटेलमध्ये कोहिनूर यांची भेट घेतली होती. ठरलेल्याकार्यक्रमाची रुपरेषा ओलांडत त्यांनी ही भेट घेतली होती. त्यावेळी ब्रिटीश राजघराण्याप्रती आपलं प्रेम व्यक्त करणाऱ्या बोमन यांचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता.