नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावाचा वाद, सिडकोवर उद्या भव्य मोर्चा

पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात, 5 हजार पोलिस कर्मचारी नवी मुंबईत दाखल

Updated: Jun 23, 2021, 10:19 PM IST
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावाचा वाद, सिडकोवर उद्या भव्य मोर्चा title=

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला (Navi Mumbai International Airport) दि. बा. पाटील यांचं नाव देण्याच्या मागणीसाठी उद्या सिडकोवर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. लोकनेते दि. बा. पाटील यांचं नाव नवी मुंबई विमानतळाला देण्यासाठी प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र आक्रमक झाला आहे. उद्या सिडको भवनाला मोठ्या संख्येने घेराव घालण्याचे आवाहन आगरी कोळी समाजाच्या नेत्यांतर्फे करण्यात आलं आहे.

मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने नवी मुंबईला छावणीचं स्वरुप आलंय. नवी मुंबई आणि पनवेल मध्ये 5 हजार पोलीस अधिकारी, कर्मचारी दाखल झाले आहेत. तसंच सिडको कार्यालय परिसर उद्या सकाळी आठ ते रात्री 12 पर्यंत अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता बंद केला आहे. अवजड वाहनांना सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत पूर्णपणे बंदी घातलेली आहे. शीव पनवेल आणि ठाणे बेलापूर मार्गावरील वाहतूक वळवण्यात आली आहे.

कल्याण-डोंबिवलीत 70 जणांना नोटीसा
कल्याण डोंबिवली परिसरातूनही अनेक जण या घेराव आंदोलनात सहभागी होणार असल्यानं कल्याण डोंबिवलीमध्ये 70 जणांना पोलिसांकडून नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. कल्याण डोंबिवलीतील राजकीय , सामाजिक, संघटनेच्या नेत्यांना नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती कल्याण परिमंडळचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली आहे. तसंच कल्याण डोंबिवलीतून नवी मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर काटई, खोणी, चक्कीनाका, शहाड पूल, दुर्गाडी पूल आणि गांधारी या ठिकाणी नाकाबंदी केली जाणार असल्याचेही पानसरे यांनी सांगितलं. पोलिसांच्या नोटीशीनंतरही आगरी समाजाच्या नेत्यांनी घेराव आंदोलनासाठी नवी मुंबईला जाणार असल्याचा निर्धार केल्यानं  उद्या नेमके काय होते? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.