मुंबई : राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी 2017 मध्ये साकारलेल्या 'वाय आय किल्ड गांधी?' या चित्रपटामुळं नव्या वादाला तोंड फुटलं आहे. चित्रपटात कोल्हेंनी नथुराम गोडसे यांची भूमिका साकारल्यामुळं त्यांच्यावर राष्ट्रवादीतील काही बड्या नेत्यांनी टीका केली आहे.
वादाला नवं वळण मिळत असतानाच आता खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा, शरद पवार यांनी सदर प्रकरणी आपली आणि थोडक्यात पक्षाचीही भूमिका स्पष्ट केली.
काय म्हणाले शरद पवार ?
'गांधींवरचा एक सिनेमा काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला. अमेरिकेतही तो प्रसिद्ध झाला. गांधींचं महत्त्वं त्यामुळं साऱ्या जगाला कळलं', असं शरद पवार म्हणारे.
त्या चित्रपटामध्ये गोडसेंची भूमिका साकारणारा व्यक्ती हा कलाकार होता. ते खुद्द गोडसे नव्हते. त्यामुळं कलेच्या नजरेतून त्या भूमिकेकडे पहावं, असं वक्तव्य त्यांनी केलं.
आपल्या वक्तव्याला आधार देणारी काही उदाहरणं त्यांनी यावेळी सर्वांपुढे ठेवली.
'उदा. छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्याच संघर्ष झाला, त्यावर चित्रपट साकारला गेला. समजा राजा शिवाजी चित्रपटात कोणी एक कलाकार महाराजींची भूमिका साकारतो आणि दुसरा कलाकार औरंगजेब साकारतो, तर तो औरंगजेब साकारणारा मुघल साम्राज्याचा पुरस्कर्ता होत नाही, तर तो कलावंत म्हणून तिथं भूमिका साकारत असतो', असं ते म्हणाले.
यावेळी रामराज्याचं उदाहरणही त्यांनी दिलं. अशा चित्रपटामध्ये रावण साकारणारी व्यक्ती प्रत्यक्ष रावण नसून, कलाकार असतो हे लक्षात घ्यावं. त्यामुळं अमोल कोल्हे यांनी ही भूमिका स्वीकारली असेल तर ती कलाकार म्हणून स्वीकारली आणि साकारली हा स्पष्ट विचार त्यांनी मांडला.
'2017 मध्ये ज्यावेळी त्यांनी ही भूमिका साकारली तेव्हा ते पक्षातही नव्हते. कलावंत म्हणून भूमिका साकारली म्हणजे ते गांधीजींविरोधात आहेत असा अर्थ निघत नाही' असं शरद पवार यांनी आपली भूमिका मांडल म्हटलं.
एक कलावंत आणि एक देशात घडलेला इतिहास या दोन गोष्टींना समोर ठेऊनच आपण व्यक्त झालं पाहिजे असा इशारा त्यांनी यावेळी दिला..
भाजपकडून होणाऱ्या टीकेवर काय म्हणाले?
कोल्हेंवर भाजपकडूनही टीका होत असल्यासंबंधीचा प्रश्न यावेळी शरद पवार यांना विचारण्यात आला. त्याचं उत्तर देत 'भाजप गांधीवादी केव्हापासून झाले?', असा उपरोधिक प्रतिप्रश्न त्यांनी मांडला.
कलावंत म्हणून अमोल कोल्हेच नव्हे मी सर्वच कलाकारांचा सन्मान करतो ही बाब त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केली.