बोअरवेलसाठी उपग्रहाद्वारे अचूक स्थान शोधण्याचे तंत्र यशस्वी

अंदाजे बोअरवेल खणल्यानंतर पाणी लागले नाही तर मोठे नुकसान होते.

Updated: Jun 25, 2019, 11:06 PM IST
बोअरवेलसाठी उपग्रहाद्वारे अचूक स्थान शोधण्याचे तंत्र यशस्वी title=

अमित जोशी, झी मीडिया, मुंबई: बोअरवेल खणण्यासाठी उपग्रहाद्वारे अचूक स्थान शोधण्याचे तंत्र यशस्वी झाले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रोत्साहनामुळे हाती घेतलेल्या या उपक्रमामुळे दुष्काळावर मात करण्यासाठी एक चांगला उपाय सापडला आहे, असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव व नानाजी देशमुख प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पांडे यांनी मुंबईत सांगितले.

संजय पांडे म्हणाले की, बोअरवेल खणण्यासाठी अचूक स्थान सापडणे हे मोठे आव्हान असते. पारंपरिक पद्धतीने खणण्यात येणाऱ्या बोअरवेलला पाणी लागतेच असे नाही किंवा पाणी लागले तरी ते पुरेसे असेलच असेही नाही. अंदाजे बोअरवेल खणल्यानंतर पाणी लागले नाही तर मोठे नुकसान होते. या पार्श्वभूमीवर उपग्रहाद्वारे बोअरवेलसाठी अचूक स्थान शोधण्याचे तंत्र महत्त्वाचे आहे. या तंत्रज्ञानाचे महाराष्ट्रासाठीचे अधिकार नानाजी देशमुख प्रतिष्ठानकडे आहेत. प्रतिष्ठान या तंत्रज्ञानाचा वापर करून बोअरवेल खणून काम पूर्ण झाल्यावर ती ग्रामसमितीकडे अथवा जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविणार आहे.

त्यांनी सांगितले की, बोअरवेलसाठीचे स्थान अचूक शोधण्यासाठीच्या नव्या तंत्रज्ञानाचा वापर सर्वप्रथम गेल्या वर्षी लातूर जिल्ह्यात केला. लातूर शहराजवळ बोअरवेल खणण्यात आले. त्याला चांगल्या प्रमाणात पाणी मिळत आहे. गेले वर्षभर या बोअरवेलमधून मिळणाऱ्या पाण्याचे निरीक्षण करण्यात आले व त्या आधारे हा प्रयोग यशस्वी झाल्याचा निष्कर्ष काढला. त्या आधारे वर्धा जिल्ह्यात आर्वी तालुक्यात खुबगाव या गावामध्ये नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून नुकतीच बोअरवेल खणण्यात आली व चांगले पाणी लागले आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून लातूर जिल्ह्यात औसा तालुक्यात तीन तर बीड जिल्ह्यात तीन बोअरवेल खणण्यात येणार आहेत. या सर्व ठिकाणच्या अनुभवाची माहिती एकत्र करून व्यापक प्रमाणात राज्यात नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी राज्य सरकारला प्रस्ताव सादर करण्यात येईल.

ते म्हणाले की, राज्यातील दुष्काळी स्थितीवर मात करून लोकांना पाण्याचा भरवश्याचा व नियमित पुरवठा करण्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भर दिला आहे. त्यासाठी त्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे टंचाईच्या भागात बोअरवेलसाठीचे अचूक स्थान शोधण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून पाहिला. हा प्रयत्न यशस्वी झाला आहे.