मनोरा पाडण्याची गरजच नाही- आमदाराचा दावा

मनोरा आमदार निवासातील आमदाऱ्यांच्या सदनिका दुरुस्त करण्यावर लाखो रुपये खर्च करून प्रत्यक्ष ही कामंच झाली नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आणलाय. 

Updated: Oct 6, 2017, 04:42 PM IST
मनोरा पाडण्याची गरजच नाही- आमदाराचा दावा title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : मनोरा आमदार निवासातील आमदाऱ्यांच्या सदनिका दुरुस्त करण्यावर लाखो रुपये खर्च करून प्रत्यक्ष ही कामंच झाली नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आणलाय. भाजपाचे तुमसर येथील आमदार चरण वाघमारे यांनी हा सगळा प्रकार समोर आणला असून याप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे तक्रारही करण्यात आलीय. 

दोन अधिकारी निलंबित

मुख्यमंत्र्यांनी तक्रारीनंतर पीडब्लूडीच्या दोन अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित केलंय. मात्र यातील मुख्य सूत्रधारावर कारवाई व्हावी अशी आता वाघमारे यांची मागणी आहे.

निधी ढापल्याचा आरोप

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपसी सहमतीने करारनामे व वर्कऑर्डर करून काम न करताच 3 कोटी 70 लाख रुपयांचा निधी आतापर्यंत ढापला असल्याचा दावा विदर्भातील आमदार चरण वाघमारे यांनी केला असून वाघमारे यांच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्र्यांनी दखल घेत या प्रकरणाची चौकशी करून कारवाईचे आदेश दिले आहेत. 

ह्या प्रकरणात मोठया प्रमाणात घोटाळा झाला असून याचमुळे मनोरा इमारत धोकादायक झाली असल्याची भीती दाखवून खाली करण्याचे सांगितले जात असल्याचे वाघमारे यांचा आरोप आहे.

आमदार वाघमारे यांचे गंभीर आरोप

आमदार वाघमारे यांनी मनोरा आमदार निवासातील त्यांच्या खोलीच्या दुरुस्तीबाबत मागणी केली होती. या दुरुस्तीवर लाखाच्या वर खर्च झाल्याने माहिती अधिकारात माहिती मागवली असता धक्कादायक वास्तव समोर आले आहे. 

यानंतर मनोरा आमदार निवासातील मनोरा आमदार निवासातील अनेक आमदारांच्या खोल्यांमध्ये किरकोळ दुरुस्तीच्या नावाखाली कामे न करता खोट्या मोजमापाची नोंद करून करोडो रुपयांची शासकीय लूट झाली असल्याचे बाब उघडकीस आली. खोटे दस्तावेज करून एकूण 3 कोटी 70 लाख 51 हजार 136 रुपयांची शासकीय निधीची अफरातफर झाल्याचे आमदार चरण वाघमारे यांचा आरोप आहे. 

खोटे रेकॉर्ड करून बिले काढल्याची तक्रार

22 जुलै 2017 रोजी एकूण 10 आमदारांच्या खोल्यांवर कामे न करता खोटे रेकॉर्ड करून बिले काढल्याची तक्रार आहे. तर 12 सप्टेंबर 2017 रोजी 21 आमदारांच्या खोल्यांमध्ये कामे न करता देयके काढल्याची तक्रार करण्यात आली आहे. यानंतर वाघमारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे तक्रार केली. मुख्यमंत्र्यांनी प्रधान सचिवांना या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले.

चौकशी अधिकारी दोषींना पाठीशी घालत असल्याचा आरोप 

मंत्र्यांनी चौकशी आदेश दिल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंग यांनी या प्रकरणी अधीक्षक अभियंता अरविंद सूर्यवंशी यांच्याकडे 7 ऑगस्ट 2017 रोजी चौकशीचे आदेश निर्गमित करून दोन दिवसात अहवाल देण्याचे सांगितले. मात्र अद्यापही चौकशी झाली नसून चौकशीला विलंब होत असल्याचे सांगत चौकशी अधिकारी दोषींना पाठीशी घालत असल्याचा आरोप आमदार वाघमारे यांनी केला आहे.

स्ट्रक्चरल ऑडिट करा, मनोऱ्याचा स्ट्रक्चर खूप चांगला - वाघमारे

मनोरा इमारत पाडण्याची गरज नाही. त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा. मनोऱ्याचा स्ट्रक्चर खूप चांगला. रिपेरिंगचे कामच झाले नाही. केवळ काम केल्याचे दाखवत पैसे लाटले असल्याचे वाघमारे यांचे म्हणणे आहे.

याप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार झाल्यानंतर शाखा अभियंता धोंडगे आणि विभागीय अभियंता भूषणकुमार फगडे यांना निलंबित करण्यात आलंय. मात्र यातील प्रमुख दोषींवर अजून कारवाई झाली नसल्याचा वाघमारेंचा आरोप आहे.