मुंबईतील २९ मॉलना अग्निशमन दलाची नोटीस, धक्कादायक माहिती समोर

 मुंबईतील (Mumbai) २९ मॉल्सना ( Mall) मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal) अग्निशमन दलाच्यावतीने (Fire Brigade) कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.  

Updated: Nov 19, 2020, 10:02 PM IST
मुंबईतील २९ मॉलना अग्निशमन दलाची नोटीस, धक्कादायक माहिती समोर  title=
संग्रहित छाया

कृष्णात पाटील / मुंबई : आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणा-या मुंबईतील (Mumbai) २९ मॉल्सना ( Mall) मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal) अग्निशमन दलाच्यावतीने (Fire Brigade) कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. नागपाडा येथील सिटी सेंटर माॅलमध्ये लागलेल्या आगीनंतर मुंबईतील ७५ माॅलची (Mumbai mall) तपासणी करून आग प्रतिबंधक उपाययोजनांची माहिती घेतली होती. यापैकी २९ मॉलमध्ये आग प्रतिबंधक उपाययोजना कागदावर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

 नियम धाब्यावर बसवणाऱ्या या माॅल मालकांनी त्रुटी दूर न केल्यास परवाना रद्द करण्यासह कायदेशीर कारवाई करण्यात असल्याचा इशारा मुंबई अग्निशमन दलानं (Mumbai Municipal Fire Brigade) दिलाय. नागपाडा येथील सिटी सेंटर माॅल मध्ये लागलेल्या आगीवर तब्बल ५६ तासांनंतर नियंत्रण मिळवण्यात मुंबई अग्निशमन दलाला यश आले होते. या भीषण घटनेनंतर मुंबईतील माॅल्स मधील अग्नी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. 

वरळी येथील एट्रिया माॅलमध्येही अनधिकृत बांधकाम झाल्याचा ठपका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी ठेवला होता. स्थायी समितीच्या बैठकीत सिटी सेंटर माॅल मधील आगीचा भडका उडाला होता. स्थायी समितीत आगीचे पडसाद उमटल्यानंतर मुंबईतील माॅल्स पालिकेच्या रडारवर आले होते. माॅल्स मधील अग्नी सुरक्षेसह अन्य काही बेकायदा बांधकाम झाले आहे का, हे पहाण्याची मोहीम हाती घेतली.

गेल्या १० दिवसांत तब्बल ७१ माॅल्सची पहाणी करण्यात आली. यापैकी २९ माॅल्स मध्ये अग्नी प्रतिबंधक उपाययोजनांसह काही त्रुटी आढळून आल्या. या २९ माॅल्सना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. एक महिन्याच्या आत त्रुटी दूर न केल्यास परवाना रद्द करण्यासह कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा माॅल्स धारकांना दिल्याचे मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. 

या माॅल्सना बजावली नोटीस

१) सीआर २ माॅल, नरिमन पॉईंट, २) सिटी सेंटर माॅल नागपाडा, ३) नक्षत्र माॅल दादर, ४) डी.बी. माॅल जुहू, ५) रिलायन्स रिटेल लि. सांताक्रूझ, ६) मिलन माॅल सांताक्रूझ (प.), ७) केनी वर्थ शाॅपिंग सेंटर खार, ८) ग्लोबल प्रा.लि. वांद्रे, ९) सुब्रिया माॅल वांद्रे, १०) टिंथ सेंटर माॅल कांदिवली ११) गोकूल शाॅपिंग सेंटर बोरिवली, १२) देवराज माॅल बिल्डिंग दहिसर, १३) रिलायन्स माॅल बोरिवली, १४) सेंटर प्लाझा माॅल मालाड, १५) के. स्टार माॅल चेंबूर, १६) ठाकूर मुव्ही अँड शाॅपिंग सेंटर कांदिवली, १७) अँनेक्स माॅल कम थिएटर कांदिवली , १८) क्युबिक  माॅल चेंबूर, १९) द माॅल मालाड, २०) हायको माॅल बिल्डिंग पवई, २१) ड्रीम माॅल भांडुप, २२) विष्णू शिवम माॅल कांदिवली, २३) साई कृपा माॅल दहिसर, २४) इस्टन प्लाझा माॅल मालाड, २५) हाय लाईफ प्रिमाईसीस सांताक्रूझ, २६) द झोन माॅल बोरिवली, २७) गारुर अँड वेल इंडिया लिमिटेड कांदिवली, २८) गोकुळ शाॅपिंग आर्किडीया बोरिवली,  २९) रिलायन्स माॅल वांद्रे अशा एकूण २९ माॅल्सना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचे मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख शशिकांत काळे यांनी सांगितले.