मुंबई: मराठी आणि इंग्रजी साहित्यविश्वात प्रयोगशील लेखनाने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारे लेखक-कादंबरीकार किरण नगरकर यांचे गुरुवारी रात्री मुंबईत निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते.
किरण नगरकर यांना मेंदूघात झाल्यामुळे या काही दिवसांपूर्वीच बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. नगरकर यांच्यावर शुक्रवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येतील.
किरण नगरकर यांचा जन्म १९४२ साली मुंबईत झाला. त्यांनी मराठीत लिहिलेली ‘सात सक्कम त्रेचाळीस’ ही कादंबरी खूप गाजली. या कादंबरीचा नंतर इंग्रजी अनुवादही झाला. मात्र, इंग्रजी भाषेतील लेखनामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष प्रसिद्धी मिळाली. ‘रावण आणि एडी’, ‘ककोल्ड’, ‘गॉड्स लिटल सोल्जर’ या साहित्यकृतींमुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. 'ककोल्ड' या साहित्यकृतीसाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कारही मिळाला.
याशिवाय, त्यांना जर्मनीच्या ‘ऑर्डर ऑफ दी मेरीट’ हा सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
Novelist Kiran Nagarkar passes away at the age of 77, at a hospital in Mumbai.
— ANI (@ANI) September 5, 2019
नगरकरांच्या कादंबऱ्या
* सात सक्कं त्रेचाळीस
* रावण अँड एडी
* ककोल्ड
* गॉड्स लिट्ल सोल्जर
* रेस्ट अँड पीस
* जसोदा: अ नॉवेल
नाटकं
* बेडटाइम स्टोरी
* कबीराचे काय करायचे
* स्ट्रेंजर अमंग अस
* द ब्रोकन सर्कल
* द विडो ऑफ हर फ्रेंड्स
* द एलिफंट ऑन द माऊस
* ब्लॅक टुलिप