एकीकडे देशातील मोठे नेते आणि दुसरीकडे बाळासाहेबांचा शिवसैनिक; पहिल्याच भाषणात मुख्यमंत्री गरजले

सभागृहात पहिलं भाषण करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका करणाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

Updated: Jul 3, 2022, 01:07 PM IST
एकीकडे देशातील मोठे नेते आणि दुसरीकडे बाळासाहेबांचा शिवसैनिक; पहिल्याच भाषणात मुख्यमंत्री गरजले title=

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे राहुल नार्वेकर बहुमताने विजयी झाले आहेत. राहुल नार्वेकर यांना 164 मतं मिळाली. यानंतर राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचं अभिनंदन केलं. दरम्यान सभागृहात पहिलं भाषण करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका करणाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "राज्यात आता भाजप-शिवसेनेचं सरकार स्थापन झालं असून आम्ही  बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन निघालोय. यापूर्वी माझ्याकडे नगरविकास मंत्रीपद होतं. त्यावेळी माझ्यासह आठ ते नऊ मंत्री बाहेर पडले. एकीकडे राज्यातील तसंच देशातील मोठमोठे नेते आणि दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा हा सैनिक एकनाथ शिंदे होता."

50 विधानसभा सदस्यांनी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यावर विश्वास ठेवला हे माझं मी भाग्य समजतो, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणादरम्यान म्हटलंय.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, "115 आमदार असतानाही देखील देवेंद्र फडणवीस यांनी मला मुख्यमंत्रीपद देत त्यांच्या मनाचा मोठेपणा दाखवला. याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह तसंच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचेही मी आभार मानतो."

या भाषणादरम्यान आज केवळ पार्श्वभूमी सांगितलीये, मात्र उद्या सगळं सांगणार आहे, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला इशारा दिला आहे.