कांद्याचे भाव वाढल्याने खवय्यांवर संक्रांत

कुरकुरीत, तिखट आणि गरमागरम कांदाभजी म्हणजे खवय्यांचा जीव की प्राण.

Updated: Dec 2, 2019, 08:26 PM IST
कांद्याचे भाव वाढल्याने खवय्यांवर संक्रांत

मुंबई: तुम्ही सध्या हॉटेलमध्ये गेलात तर तुम्हाला मेन्यूकार्डवरचे काही पदार्थ बदललेले दिसतील किंवा त्याचे रेट तरी वाढलेले दिसतील. तुम्हाला ओनियन उत्तप्पा आवडत असेल, तर तुम्हाला नक्कीच सरप्राईज मिळेल. कारण, तुम्हाला कधी नव्हे तो ओनियन उत्तप्पाऐवजी आलू उत्तप्पा चाखायला मिळेल. याचे कारण म्हणजे कांद्याचे गगनाला भिडलेले भाव.

यामुळे रस्त्यावरील स्टॉल्स आणि हॉटेलमध्ये खवय्येगिरी करणाऱ्यांचा खिसा हलका होऊ लागला आहे. एरवी कुरकुरीत, तिखट आणि गरमागरम कांदाभजी म्हणजे खवय्यांचा जीव की प्राण. मात्र, काही दिवसांतच ही कांदाभजी वडे आणि भजीच्या स्टॉल्सवरुन निरोप घ्यायची शक्यता आहे. इतके दिवस वीस रुपये प्लेट असणारी कांदाभजीच्या प्लेटसाठी आता ४० ते ५० रुपये मोजावे लागत आहेत. 

रस्त्यावरचे स्टॉल्स सोडा, हॉटेलमध्ये खायला गेलात तरी तिथेही सरप्राईज मिळेल. कारण ओनियन उत्तप्पामधून, ओनियन डोसामधून कांदाच गायब झाला आहे. अनेक हॉटेल्समध्ये एक्स्ट्रा कांद्यासाठी १० रुपये मोजावे लागतील, अशा सूचना लावण्यात आल्या आहेत. तर अनेक हॉटेल्समध्ये मिसळ, पावभाजीबरोबर दिल्या जाणाऱ्या कांद्याची जागा मुळ्याने घेतली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून शेतात काबाडकष्ट करणारा कष्टकरी बळीराजा हा शेतमालाला बाजारभाव मिळत नसल्याने कर्जबाजारी होत चालला होता, त्यातून दुष्काळी संकट व परतीच्या पावसाने उभी पिके पाण्याखाली गेली.त्यामुळे मोठ्या भांडवली खर्चातून उभा केलेला शेतमाल पाण्यात गेल्यामुळे या शेतकर्‍यांवर मोठा कर्जाचा बोजा उभा राहिला मात्र सध्या कांद्याला सोन्याचे भाव आल्याने हा कांदा आता शेतकर्‍यांना लखपती बनवत आहे.