मुंबई : भारताने कांदा निर्यात बंद केल्याने फक्त शेतकऱ्यांनाच वाईट वाटलं असं नाही, तर शेजारी राष्ट्रांनाही याचा मोठा फटका बसला आहे. भारतात कांद्याचे भाव काहीसे वाढत आहेत, हे सरकारच्या लक्षात आल्यानंतर सरकारने कांदा निर्यातीवर बंदी आणली. कारण भाजपाने एकदा कांद्याचे भाव वाढल्याने दिल्ली विधानसभा निवडणुकीत फटका खाल्ला आहे.
आता महाराष्ट्र आणि हरियाणात निवडणूक सुरू असल्याने सरकारला ही चूक पुन्हा करायची नाहीय. म्हणून सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला, पण यामुळे भारत ज्या राष्ट्रांना कांदा देत होता. त्या राष्ट्रांमध्ये कांद्याचे भाव दुप्पट झाले आहेत.
बांगलादेश, श्रीलंका, मलेशिया, नेपाळ, संयुक्त अरब अमिरातीत कांद्याचे भाव कडाडले आहेत. कारण भारतातून मोठ्या प्रमाणात या देशांना कांदा जात होता.
भारतात मान्सूनच्या शेवटच्या काळात पाऊस एवढा 'धो धो' कोसळला की कांदा पिकाला मोठा फटका देऊन गेला. त्या आधी कांदा पिकवणाऱ्या मुख्य राज्यात म्हणजेच महाराष्ट्रात भीषण दुष्काळ होता. यामुळे कांदा पाहिजे तेवढ्या प्रमाणात मिळत नव्हता.
यामुळे भारतात कांद्याच्या भाव वाढीला वेग आला, पण सरकारने निवडणुकांचा काळ आणि कांद्याचा नको तेवढा भाव वाढल्याने, सरकारवर टीका होईल म्हणून निर्यात बंदी केली खरी, पण शेजारील राष्ट्रांमध्ये कांद्यांचा तुटवडा वाढल्याने भाव दुप्पट झाले आहेत.