मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना अजूनही भाजपाची उमेदवारी मिळालेली नाही. भाजप उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झाली. पण त्यातही एकनाथ खडसे यांचं नाव नाही. एकनाख खडसेंसारखा खानदेशातील एक दिग्गज नेता नाराज आहे. खडसेंना आपल्या पक्षात आणता येईल का? यासाठी राष्ट्रवादीने प्रयत्न सुरू केले असल्याचं दिसून येत आहे. तसेच नाराज खडसे यांना भेटण्यासाठी अजित पवार आज एकनाथ खडसे यांची भेट घेण्यासाठी जळगावकडे रवाना झाले आहेत, अशी माहिती आज परळीत धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
एकनाथ खडसे यांच्या ऐवजी त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना पक्षाने उमेदवारी देऊ केली आहे, अशी देखील चर्चा आहे. पण याबाबतीत पक्षाकडून अधिकृत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
अर्थातच एकनाथ खडसे यांना अद्याप उमेदवारी जाहीर न झाल्यामुळे ते नाराज आहेत. तसेच यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांचा देखील सल्ला घेतला आहे, यात त्यांनी 'तुम्ही मला साथ द्याल का?' असा सवाल करत सर्वांना मदतीचं आवाहन केलं आहे. यावरून एकनाथ खडसे हे बंडाच्या तयारीत असल्याचेही संकेत आहेत.
दुसरीकडे तत्कालीन संघटन मंत्री राजेंद्र फडके यांनी एकनाथ खडसे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे. एकनाथ खडसे यांच्या उमेदवारीविषयी लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल. आज सायंकाळपर्यंत यावर निर्णय होण्याची शक्यता असल्याचं राजेंद्र फडके यांनी म्हटलं आहे. कारण उमेदवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवस 3 ऑक्टोबर आहे, त्यातही दुपारी 3.30 आधी अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचणे देखील आवश्यक आहे.