ऑनलाईनमुळे आर्थिक राजधानी मुंबईतही व्यापाऱ्यांच्या 'दिवाळी' मंदी

एका बाजूला परतीच्या पावसानं राज्यभरातील शेतकऱ्यांना हवालदिल केलं आहे.

Updated: Oct 30, 2019, 12:03 AM IST
ऑनलाईनमुळे आर्थिक राजधानी मुंबईतही व्यापाऱ्यांच्या 'दिवाळी' मंदी title=

दीपाली जगताप-पाटील, झी मीडिया, मुंबई : एका बाजूला परतीच्या पावसानं राज्यभरातील शेतकऱ्यांना हवालदिल केलं आहे. तर दूस-या बाजूला देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईतही व्यापाऱ्यांची 'दिवाळी' साजरी झालीच नाही. 

दिवाळी म्हटलं की मुंबई शहरातील व्यापाऱ्यांचा धंद्याचा टाईम. पण यंदा धंदा झालाच नाही उलट दिवाळं निघालंय असं म्हणायची वेळ दुकानदारांवर आलीय. 

देशातली आर्थिक मंदी आणि ऑनलाईन शॉपींग यामुळे मुंबईतील मोठ्या बाजारांमध्ये दिवाळीत व्यवसाय अपेक्षेपेक्षा अधिक खालावल्याचं चीत्र आहे. एका बाजूला आर्थिक मंदी आणि दुसऱ्या बाजूला ऑनलाईन शॉपींगमुळे ग्राहक दुकानांपर्यंत पोहचलाच नसल्याचं व्यापा-यांचं म्हणणं आहे. 

दादर, भुलेश्वर, अंधेरी, विलेपार्ले बाजारात दिवाळीतला व्यापार 30-35 टक्यांनी घटला आहे. दुकानांमधून कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाण्याचं प्रमाण वाढलंय, काही दुकानं तर बंद होण्याच्या मार्गावर आहेत. 

तर सोन्याचा व्यापार 40 टक्यांहून अधिक घसरला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत किराणा व्यापारही 40-45 टक्यांनी कमी झाला आहे. फुलांच्या बाजारालाही पावसाचा फटका बसला आहे. 

एकीकडे ऑनलाईन खरेदीत मिळणाऱ्या बंपर ऑफर्स तर दुसरीकेड फेरीवाल्यांचं आव्हान.. यामुळे कर भरणाऱ्या अधिकृत दुकानदारांचं कोट्यवधीचं नुकसान होतंय. 

देशभरात अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त होत असताना ऐन दिवाळीतही व्यापारी वर्ग समाधानी नसल्याचंच चित्र आहे. 

मुंबईसारख्या श्रीमंत समजल्या जाणा-या शहरातही व्यापारी वर्गाचा व्यवसाय होऊ शकत नसेल तर भविष्यात आर्थिक राजधानीतच अर्थव्यवस्था कमालीची कोलमडेल याची शक्यता नाकारता येत नाही.