पवार-विखे मैत्रीचा नवा अंक, वैर संपल्याची चर्चा

पवार - विखे घराण्यात सुरू असलेलं राजकीय वैर नव्या पिढीनं संपवलं?

Updated: Feb 11, 2019, 02:12 PM IST
पवार-विखे मैत्रीचा नवा अंक, वैर संपल्याची चर्चा title=

दीपक भातुसे, मुंबई : राज्यात पवार आणि विखे-पाटील घराण्यात जुनं वैर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी केंद्रीय मंत्री दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांच्यापासून सुरू असलेले वैर त्यांच्या पुढच्या पिढीतही सुरू आहे. मात्र बाळासाहेब विखेंचे नातू सुजय विखे आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार यांच्या भेटीने हे वैर संपल्याची चर्चा सुरू झाली आहे.

दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांचे नातू आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे आणि शरद पवार यांचे नातू आणि अजित पवार यांचे पुतणे रोहित दोघेही एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून जुने राजकीय वैर संपल्याची आणि नव्या मैत्रीची साक्ष देत आहेत. राज्याच्या राजकारणात मागील दोन पिढ्या पवार - विखे घराण्यात सुरू असलेलं राजकीय वैर नव्या पिढीनं संपवण्याचं ठरवलेलं या फोटोवरून दिसतं आहे.

पवार - विखे घराण्याला वादाची परंपरा

- दिवंगत बाळासाहेब विखे पाटील आणि शरद पवार यांच्यातील वाद जुना आहे

- बाळासाहेब विखे-पाटील आणि शरद पवार यांच्यातील वाद १९९१च्या लोकसभा निवडणुकीत विकोपाला गेला.

- २००८ साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत शिर्डी मतदार संघ राखीव झाल्यानंतर पवार यांच्या आग्रहाने रामदास आठवले यांना तेथून उमेदवारी देण्यात आली. त्या मोबदल्यात विखे-पाटलांनी अहमदनगर मतदारसंघ सोडण्याचा निर्णय झाला होता. मात्र, ऐनवेळी पवारांनी भूमिका बदलल्याने विखे-पाटलांची खासदारकी संपुष्टात आली.

- या दोन्ही नेत्यांनी राजकारणात एकमेकांवर कुरघोड्या करण्याची संधी कधीच सोडली नव्हती

- हा वाद पुढे अजित पवार आणि राधाकृष्ण विखे पाटील या पुढच्या पिढीच्या नेत्यांमध्येही सुरू राहिला

- 2009 च्या विधानसभेच्या निवडणुकीत राधाकृष्ण विखे-पाटील यांचा पराभव करण्यासाठी राष्ट्रवादीने प्रयत्न केले, त्यामुळेच 2004 च्या निवडणुकीत 70 हजारांचे मताधिक्य घेणारे विखे-पाटील 2009 च्या निवडणुकीत 12 हजारांच्या मताधिक्याने कसेबसे निवडून आले.

- अर्थमंत्री असताना अजित पवार यांनी तेव्हा कृषीमंत्री असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्या खात्यातील ठिबक सिंचन योजनेला निधी न देणे.

- राधाकृष्ण विखेंची मुळा प्रवरा सहकारी वीज कंपनी बरखास्त करण्याचा तत्कालीन ऊर्जामंत्री अजित पवारांची खेळी.

आता रोहित पवार आणि सुजय विखे पाटील यांनी पवार - विखे घराण्यातील हे जुने राजकीय वैर संपुष्टात आणण्याचे ठरवलेले दिसते. रोहित पवार यांनी प्रवरानगर येथे विखे पाटील सहकारी कारखान्यास भेट देऊन सुजय विखेंची भेट घेतली. या दोघांच्या भेटीत चर्चा कोणती रंगली हे समजले नसले तरी या भेटीतून नव्या मैत्रीपर्वाची सुरुवात झाल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात रंगली आहे. 

आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडे असलेली नगरची जागा काँग्रेसला सुजय विखे पाटलांसाठी हवी आहे. मात्र राष्ट्रवादी अद्याप ही जागा सोडायला तयार नाही. सुजय विखे आणि रोहित पवार यांच्या भेटीनंतर या जागेबाबत राष्ट्रवादी काय निर्णय घेते याकडेही आता लक्ष लागलं आहे. राष्ट्रवादीने ही जागा सुजय विखेंसाठी सोडली तर पवार-विखे वादाचा अंक संपून, मैत्रीचा नवा अंक राज्याच्या राजकारणात सुरु होईल.